लोणावळा : ज्या चिमुकल्याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी संपूर्ण कुटुंब लोणावळ्यात आले, त्याच चिमुकल्याचा वाढदिवसाच्या आदल्या रात्री स्विमिंग टॅंकमध्ये बुडून करुण अंत झाल्याची दुर्दैवी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना बुधवारी ( दि. १३) रात्री लोणावळा शहरात घडली.
शिवबा अखिल पवार (वय २ वर्ष, रा. सध्या शिक्रापूर, शिरूर, मूळ रा. पाथर्डी, अहमदनगर) असे या दुर्दैवी चिमुकल्याचे नाव आहे. शिवबा आणि त्याची जुळी बहीण यांचा दुसरा वाढदिवस १४ जुलै रोजी होता. तो साजरा करण्यासाठी त्याचे कुटुंबीय शिक्रापूर येथून १३ जुलै रोजी लोणावळ्यात आले होते. लोणावळ्यातील तुंगार्ली विभागात असलेल्या ‘पुष्पव्हीला’ या बंगल्यात ते राहिले होते.
खेळताना तोल जाऊन स्वीमिंग पूलमध्ये पडला
त्याठिकाणी रात्री ११.३० वाजण्याच्या सुमारास सर्वजण बंगल्याच्या आतमध्ये वाढदिवसाची तयारी करीत असताना शिवबा हा खेळत बाहेर आला आणि त्याचा तोल जाऊन तो स्वीमिंग पूलमध्ये पडला. काही वेळानंतर शिवबा जवळ कोठेच दिसत नाही. म्हणून त्याच्या आई वडील व नातेवाईक यांनी शोधा शोध सुरू केली पण तो सापडला नाही.
अखेर ते जलतरण तलावा जवळ आले असता, त्यांना शिवबा जलतरण तलावाच्या पाण्यात आढळून आला. नातेवाईकांनी तत्काळ पाण्यात जाऊन शिवबाला बाहेर काढले. पण तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेबाबत लोणावळा शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून, या घटनेचा पुढील तपास लोणावळा शहर पोलिस करीत आहे.