पुण्यात वाहतूक होणार अधिक शिस्तबद्ध; RTO कडून घेण्यात आला 'हा' महत्त्वपूर्ण निर्णय
पुणे : शहरातील रिक्षाचालक आणि प्रवाशांसाठी एक मोठा दिलासा देणारा निर्णय प्रादेशिक परिवहन प्राधिकरण (आरटीओ) कडून घेण्यात आला आहे. शहरातील ६९५ रिक्षा थांब्यांना आता अधिकृत मान्यता देण्यात आली असून, हे थांबे लवकरच नियमानुसार कार्यरत होणार आहेत.
१९ मे २०२५ रोजी झालेल्या आरटीओच्या बैठकीत शहरातील विविध ठिकाणच्या जुन्या व नव्याने प्रस्तावित अशा रिक्षा थांब्यांचे फेरसर्वेक्षण मांडण्यात आले. पुण्यातील ४१ पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रात हे थांबे असून, या सगळ्यांना आता अधिकृत दर्जा मिळाल्याची माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी स्वप्निल भोसले यांनी दिली. या थांब्यांची माहिती स्पष्टपणे देण्यासाठी पुणे महानगरपालिकेला सूचना दिल्या असून, लवकरच प्रत्येक थांब्यावर फलक लावण्यात येणार आहेत. या फलकांवर थांब्याचे स्थान, तेथील क्षमतेची माहिती आणि इतर वाहनांसाठी असलेली बंदी यासारख्या सूचना नमूद असतील.
दरम्यान, शहरातील आणखी काही भागांमध्ये रिक्षा थांब्यांची गरज असल्यास, स्थानिक नागरिक, चालक, मालक आणि संघटनांनी वाहतूक पोलिस शाखेकडे थेट अर्ज करावा, असे आवाहन आरटीओने केले आहे. सर्वेक्षणानंतर अशा थांब्यांना देखील मान्यता दिली जाईल. या निर्णयामुळे शहरातील सार्वजनिक वाहतुकीत सुधारणा होऊन, वाहतूक अधिक सुस्थितीत राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
पुण्यातील वाहतूक कोंडीचा राज ठाकरेंना फटका
पुण्यातील वाहतूक कोंडी हा आता जोरदार चर्चेचा विषय बनला आहे. याचा सामान्य नागरिकांना तर रोज सामना करावा लागत आहे. नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे नदीपात्रातील रस्ता बंद असल्याने मध्यवर्ती भागामध्ये वाहनांची मोठी गर्दी होत आहेत. त्याचबरोबर गणेशोत्सवामुळे खरेदीसाठी देखील अनेकजण हे पुण्यामध्ये येत आहेत. त्याचबरोबर जागोजागी मंडप घातले गेल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी होत आहे. याचा फटका आता राजकीय नेत्यांना देखील बसू लागला आहे. पुण्यामध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा वाहतूक कोंडीमध्ये अडकला असल्याचे दिसून आले आहे. पण, आता ही वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.