Maratha Andolan : खेड टोलनाक्यावर वाहतूक धीम्या गतीने; शेकडो वाहनांची मार्गावर गर्दी
चाकण : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी शुक्रवारी (दि.२९) मुंबई येथील आझाद मैदानावर आंदोलन होत आहे. या आंदोलनासाठी आंतरवली सराटी येथून आळेफाटा, जुन्नर नारायणगाव, खेड मार्गे हजारो वाहनांचा ताफा गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास खेड टोलनाक्यावर आला. त्यावेळी शेकडोंच्या संख्येने ही वाहने या ठिकाणी पाहायला मिळाली. यामुळे दोन किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळाल्या.
मराडवाड्यातील विविध भागातून आंदोलनकर्ते आपापल्या वेगवेगळ्या वाहनांच्या माध्यमातून मुंबईच्या दिशेने निघाले होते. त्यामुळे खेड टोलनाका परिसर आंदोलनकर्त्यांच्या विविध घोषणांनी दणाणून गेलेला पाहायला मिळाला. तसेच आंदोलकांची वाहने कोणत्याही अडथळ्याविना रवाना होण्यासाठी पोलिस प्रशासनाने जागोजागी पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. याशिवाय, नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणारी इतर वाहने वेगवेगळ्या ठिकाणी वळविल्याने वाहनांची गर्दी आटोक्यात आणण्यास मोलाचा हातभार लागलेला पाहायला मिळाला.
हेदेखील वाचा : Maratha Reservation: “…असं मला वाटत नाही”; मंत्री उदय सामंत यांची जरांगे पाटलांवर प्रतिक्रिया
दरम्यान, जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी आक्रमक होऊन २९ ऑगस्ट रोजी मुंबईत आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. मराठा आरक्षण घेतल्याशिवाय माघारी परतणार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे. त्यामुळे राज्यभरातील हजारो मराठा समाजाचे तरुण मुंबईत आंदोलनासाठी जाताना दिसत आहेत. अचानकपणे इतक्या मोठ्या संख्येने हे आंदोलक-कार्यकर्ते जात असल्याने रस्ते वाहतुकीवर याचा परिणाम झाला. महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसून आल्या.
राजकारण आम्ही करत नाही
‘राजकारण आम्ही करत नाही, राजकारण जे आहे, जाती-जातीमध्ये भेदाभेद करण्याचे काम गेल्या दहा वर्षात जास्त झालं, तिकडे नरेंद्र मोदी केंद्रामध्ये असतील आणि महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस असतील, जाती-पातीचे तुकडे पाडायचे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी जी मराठी माणसाची भक्कम एकजूट केली. मराठी माणसाची एकजूट टिकवू नये राहू नये आणि सत्ता मिळवण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी राजकारण केलं, असा आरोप खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर केला आहे.