अंबरनाथ / दर्शन सोनावणे : गौण खनिजांची अवैध वाहतूक करणारा ट्रक कारवाई दरम्यान तहसिल कार्यालयाच्या आवारातून पळवून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी सकाळी सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान गौण खनिजाची वाहतूक करणारा ट्रक बदलापूरच्या मंडळ अधिकारी यांच्या दक्षता पथकाने जप्त केला होता. हा ट्रक अंबरनाथ तहसिल कार्यालयाच्या पटांगणात उभा करून आवश्यक कारवाई करण्यात येत होती. मात्र कारवाई केल्याने संतप्त झालेल्या ट्रक मालकाने जप्त केलेला ट्रक परस्पर कोणत्याही परवानगी शिवाय तहसिल कार्यालयाच्या आवारातून पळवून नेला. याप्रकरणी अंबरनाथ पश्चिम पोलीस ठाण्यात मुजोर ट्रक मालक आणि चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गौण खनिजांची वाहतूक करत असतांना बदलापूर मंडळ अधिकारी यांच्या दक्षता पथकाने अंबरनाथ पूर्वेच्या फातिमा शाळेजवळ ट्रक क्रमांक एमएच ०५ एएम २००४ या वाहनाची तपासणी केली. यावेळी वाहनचालकाने २ ब्रास वजनाचे दगड पावडर हे गौण खनिज घेऊन जात असतांना वाहतूक परवाना/ दुय्यम विक्री परवाना सोबत ठेवला नसल्याची बाब दक्षता पथकाच्या निदर्शनास आली. त्यामुळे हा ट्रक मुद्देमालासह पुढील कारवाई करिता तहसिल कार्यालयात आणण्यात आला होता. यावेळी ट्रक जमा करण्याची कारवाई सुरू असतांना ट्रक मालक अनमोल सिंग (४०) आणि चालक अर्जुन जाधव (४०) यांनी कारवाई दरम्यान गोंधळ घातला. तसेच ते इतक्यावरच न थांबता मुजोर चालकाने कोणत्याही परवानगी शिवाय ट्रक परस्पर पळवून नेला. अखेर दक्षता पथकाने अंबरनाथ पश्चिम पोलिसांच्या मदतीने ट्रक पुन्हा ताब्यात घेत जप्त केला. या प्रकरणी अंबरनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अशी माहिती तहसीलदार अमित पुरी यांनी दिली. दरम्यान या कारवाईमुळे गौण खनिजांची अवैध वाहतूक करणाऱ्यांचे धाबे चांगलेच दणाणले आहेत. ट्रक मालकाच्या या प्रतापाची सध्या तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.
तर तहसीलदार अमित पुरी यांनी सर्व गौण खनिज उत्खनन व वाहतूक करणारे संबंधित विकासक / कंत्राटदार यांना आवाहन केले आहे. अंबरनाथ तालुक्यात विकास कामासाठी होत असलेल्या उत्खननाबाबत संबंधित कार्यालयाकडून उत्खनन / वाहतूकीची परवानगी घेऊनच उत्खनन / वाहतूक करावी. विनापरवानगी उत्खनन / वाहतूक आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ (७) व ४८ (८) मधील तरतुदीनुसार दंडनीय कारवाई करण्यात येईल. असे आवाहन तहसीलदार अमित पुरी यांनी केले आहे.