Sambhaji Bhide
पुणे : शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी उर्फ संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांच्याविरोधात महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी (Tushar Gandhi) यांनी पुणे पोलिसांत तक्रार दिली आहे. महात्मा गांधींबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी संभाजी भिडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करून कारवाई करावी, अशी मागणी तुषार गांधी यांनी केली.
डेक्कन पोलिस ठाण्यात तुषार गांधी यांच्या वतीने अॅड. असीम सरोदे यांनी ही तक्रार दाखल केली आहे. याबाबत तुषार गांधी म्हणाले, ‘संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी व त्यांच्या कुटुंबाच्या चारित्र्यावर हल्ला केला. यामुळे आम्ही प्रचंड व्यथित झालो आहोत. पुण्यातील गांधीवादी संघटनांसोबत मिळून आज आम्ही अॅड. असीम सरोदे यांच्यामार्फत डेक्कन पोलिसांकडे ही तक्रार केली आहे. पोलिस जबाबदारीने कारवाई करतील, अशी आम्हाला आशा आहे.
तसेच पोलिसांनी याप्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संभाजी भिडे, त्यांची संघटना व अमरावतीतील ज्या कार्यक्रमात भिडेंनी महात्मा गांधींविषयी वादग्रस्त वक्तव्य केले, त्या कार्यक्रमाच्या आयोजकांवर गुन्हे दाखल करून कारवाई करावी, अशी आमची मागणी आहे.
काय म्हणाले होते संभाजी भिडे?
महात्मा गांधी यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितले जाते. पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत. महात्मा गांधींचे जे वडील म्हणवले जातात ते करमचंद गांधी हे एका मुस्लिम जमीनदाराकडे कामाला होते. त्या जमीनदाराची मोठी रक्कम चोरून करमचंद गांधी पळून गेले होते. त्यामुळे चिडलेल्या मुस्लिम जमीनदाराने करमचंद गांधी यांची पत्नी म्हणजेच महात्मा गांधीजींच्या आईला पळवून घरी आणले, असे वादग्रस्त विधान केले होते.