दोन सख्ख्या भावांनी केली भावाची हत्या; न्यायालयाने आरोपी भावंडांना सुनावली 'ही' शिक्षा
जमिनीच्या वादातून स्वतःच्या सख्ख्या मोठ्या भावाचा खून केला होता. याप्रकरणी दोन सख्ख्या भावांना येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. पी. पोळ यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. बाबाजी नामदेव घेवडे (वय 52) दिलीप नामदेव घेवडे (वय 58) (दोघेही राहणार घेवडेवाडी कोरेगाव तालुका आंबेगाव) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपींची नावे आहेत.
या खून खटल्याची माहिती अशी की, मंचर पोलीस ठाण्याच्या कार्य कक्षेत घेवडेवाडी कारेगाव तालुका आंबेगाव येथे 26 एप्रिल 2016 मध्ये जमिनीच्या वादातून गणपती नामदेव घेवडे (वय 58) यांची बाबाजी घेवडे आणि दिलीप घेवडे या त्यांच्या सख्या लहान दोघा भावांनी कुऱ्हाड व कोयत्याने वार करून निर्गुण खून केला होता.
मयताचा मुलगा आणि पत्नीवर देखील कुऱ्हाड आणि कोयत्याने वार करून त्यांच्या खुनाचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी गणपती यांची पत्नी हौसाबाई गणपत घेवडे यांनी मंचर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. मंचर पोलीस ठाण्याचे तात्कालीन पोलीस निरीक्षक एस. बी. गोडसे यांनी तपास करून दोन्ही आरोपी भावांना 30 एप्रिल 2016 रोजी अटक केली होती. हा खटला राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात न्यायाधीश एस.पी. पोळ यांच्यापुढे सुरू होता.
सहाय्यक सरकारी अभियंता विकास देशपांडे, संतोष वाघ यांनी या प्रकरणात 16 साक्षीदार तपासले. यासह फिर्यादीचे वकील ॲड. हेमंत बगाटे, .ॲड. ऋषिकेश पाटील, ॲड. केदार गुरव यांनी दोन साक्षीदारांची साक्षर घेतली. सरकारी पक्षाचा प्रभावी युक्तिवाद आणि फिर्यादींची साक्ष या खटल्यात महत्त्वाची ठरली.
दरम्यान, न्यायाधीश पोळ यांनी आरोपी बाबाजी घेवडे, दिलीप घेवडे या दोन भावांना खूनप्रकरणी सश्रम जन्मठेप व मयताचा मुलगा, पत्नी यांच्या खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी दहा वर्षे सश्रम कारावासाठी शिक्षा ठोठावली. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस उपनिरीक्षक सुनील सोळसकर व कोर्ट अंमलदार महिला पोलीस हवालदार सुनीता बटवाल यांनी काम पाहिले. या खून खटल्याकडे खेड आंबेगाव आणि जुन्नर तालुक्याचे लक्ष लागले होते.