पिंपरी : दोन तळीरामांनी पीएमपी बस थांबवून चालकाला दमदाटी करत चालत्या बसचे स्टेअरिंग हातात घेऊन बस वाकडी तिकडी चालविल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे अनेक वाहनांना व नागरिकांना बसची धडक बसण्याची शक्यता निर्माण झाली होती. या प्रकारामुळे बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांच्या जिवाचा थरकाप उडाला. बस चालकाने प्रसंगावधान राखत, स्टेअरिंग पुन्हा हातात घेतल्याने पुढील अनर्थ टळला. या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना भोसरीतील पीएमटी चौक येथे घडली.
याप्रकरणी सचिन गुणाजी पारधे (रा. ताडीवाला रोड, पुणे स्टेशन) यांनी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार संतोष जाधव (वय ४०), जितेश रमेश राठोड (वय ३६, रा. महाळुंगे, चाकण) अशी गुन्हा दाखल झालेल्या मद्यपींची नावे आहेत. हे दोघेही पीएमपीचे कंत्राटी चालक आहेत.
नेमकं काय घडला प्रकार?
जाधव व राठोड यांनी दारूच्या नशेत पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) बसला हात दाखवला. त्यानंतर त्यांनी बसमध्ये चढून बसचालक सूरज सुखलाल काळे (वय २४) यांना शिवीगाळ केली. बसचालकाच्या केबिनमध्ये जाऊन ‘तू शांत बस, आम्हीसुद्धा बसचालक आहोत, आम्हाला शिकवू नकोस,’ असे म्हणत आरडाओरडा करीत बसचे स्टेअरिंग हातात घेतले. यामुळे बस वाकडी- तिकडी होऊन रस्त्यावरील वाहनांना व नागरिकांना धडकून अपघात होऊ शकतो, असे कृत्य त्यांनी केले.
दरम्यान, बस चालकाने स्टेअरिंग ताब्यात घेत बस जाग्यावरच थांबवली. दरम्यान, आरोपींनी फिर्यादी यांना शिवीगाळ करून, त्यांची गचांडी पकडून त्यांच्या मानेवर नखाने ओरखडले. यामध्ये फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर आरोपींनी बसमधील प्रवाशांनाही शिवीगाळ केली. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.