मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील ग्रामीण भागात चिकनगुनिया सदृश्य रुग्णांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कारेगाव व करोळ पाचघर ग्रामपंचायतींमध्ये जोरदार ताप, अंगावर पुरळ, सांधेदुखी अशी लक्षणे असलेले अनेक रुग्ण आढळून आले आहेत. या संसर्गजन्य आजाराचा प्रसार झपाट्याने वाढण्याची चिन्हे असून नागरिक मोठ्या प्रमाणावर उपचारासाठी खाजगी रुग्णालयांकडे वळत आहेत. सरकारी आरोग्य सेवेकडून पुरेसे उपचार मिळतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.
यापूर्वी नाशेरा गावात दोन महिन्यांपूर्वी अशीच साथ आल्याचे समोर आले होते. सध्या परिस्थिती आणखी गंभीर होत असल्याने आरोग्य यंत्रणेकडून युद्धपातळीवर उपाययोजना करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात ग्रामीण भागात साथरोगांचे प्रमाण वाढते. अगदी एक महिन्यापूर्वीच जव्हार तालुक्यातील राजेवाडीत गॅस्ट्रोमुळे दोन मृत्यू झाल्याने प्रशासन जागे झाले होते. मात्र, तोपर्यंत जीवितहानी झाली होती. आता मोखाड्यातही अशीच परिस्थिती निर्माण झाल्याने ग्रामस्थ चिंतेत आहेत.
आरोग्य विभागाने दरवर्षी मान्सूनपूर्व तयारी केली असल्याचा दावा केला जातो; मात्र ती केवळ कागदोपत्री असल्याचे वास्तव आहे. वेळेवर फवारणी होत नाही, दूषित पाण्याचे स्रोत, गावातील कचरा व शेण साचण्याची ठिकाणे यांचा सर्वेक्षण होत नाही. त्यामुळे दरवर्षी डेंग्यू, गॅस्ट्रो किंवा आता चिकनगुनिया सदृश्य साथ पसरते आणि प्रशासन फक्त रोग वाढल्यानंतरच सक्रिय होताना दिसते. या सर्व समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी एखाद्या ठोस यंत्रणेला जबाबदारी सोपविण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.
आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात्र “आम्ही सर्वेक्षण सुरू केले आहे, किती रुग्ण आहेत आणि नेमका कोणता आजार आहे याची माहिती लवकरच दिली जाईल” असे सांगितले आहे. मात्र, प्रत्येक घरात किमान एक रुग्ण आढळत असल्याने ही साथ पसरत असल्याची भीती नागरिकांत वाढत आहे.