
म्हसवड : भोई समाजाचे संत श्री भीमा भोई यांची जयंती म्हसवड शहरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे या समाजाची जयंती होऊ शकली नव्हती. यंदा मात्र कोरोनाचे सर्व निर्बंध हटल्यामुळे भोई समाजाने आपल्या संताची जयंती दणक्यात साजरी करण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार गुरुवार दिवसभर विविध सामाजिक कार्यक्रम राबवण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हा भोई समाजाचे अध्यक्ष व सदस्य उपस्थित होते. यावेळी सकाळच्या सत्रात संत भिमा भोई यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला. तर दुपारी श्री संत भिमा भोई यांच्या प्रतिमेवर पुष्पवृष्टी करण्यात आली. त्यानंतर समाजातील शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महिलांच्या हळदी कुंकूचा कार्यक्रम संपन्न झाला. तर समाजातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
सायंकाळी पालखीतून श्री संत भिमा यांच्या प्रतिमेची भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भोई समाजातील महिला वर्गाची संख्या लक्षणीय होती तर बीड (पाटोदा) येथील बँडने सर्वांना संमोहीत केले. यावेळी भोई समाजाने काढलेली पालखी मिरवणुक पाहण्यासाठी म्हसवडकरांनी मोठी गर्दी केली होती. त्यानंतर समाजाच्या वतीने महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. हा महाप्रसाद बनवण्यातही भोई समाजातील महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या.