संग्रहित फोटो
रत्नागिरी : ‘आम्ही शेवटी प्रशासनात आहोत, कुणी मंत्री म्हणून काम करतोय तर कुणी पदाधिकारी म्हणून. प्रत्येकाने आपापल्या स्तरावर जबाबदारीने काम केले पाहिजे. मात्र, ज्यांना वैयक्तिक राजकारण करायचे असेल त्यांनी ते या जिल्हा परिषदेच्या गेटच्या बाहेर ठेवावे. जिल्हा परिषदेच्या आत राजकारण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची आता गय केली जाणार नाही,’ अशा शब्दांत राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कडक इशारा दिला आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या ३० व्या वार्षिक स्नेह संमेलनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, प्रकल्प संचालक विजयसिंह जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, बाबू म्हाप, रत्नागिरी पंचायत समितीचे सभापती प्रवीण पांचाळ, गुहागरचे सभापती प्रणव पोळेकर यांच्यासह विविध तालुक्यांचे सभापती आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
जिल्हा परिषदेवर कोणाचाही दबाव राहू नये
उदय सामंत यांनी आपल्या भाषणात प्रशासकीय शिस्तीवर बोट ठेवताना स्पष्ट केले की, काही कक्ष अधिकारी आणि कर्मचारी विशिष्ट समाजाचे नेते असल्याच्या अविर्भावात राहून समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा किंवा राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा प्रवृत्तींची संपूर्ण माहिती माझ्याकडे असून, राजकारणासाठी जिल्हा परिषदेचे टेबल वापरणाऱ्यांचा बंदोबस्त केला जाईल. जिल्हा परिषदेवर कोणाचाही दबाव राहू नये आणि प्रत्येक कर्मचाऱ्याला राजशिष्टाचाराप्रमाणे मान मिळाला पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. मात्र, काही लोकांनी अधिकाऱ्यांवर दबाव वाढवून स्वतःची दुकाने चालवण्याचा प्रयत्न केला आहे, तो आता दिनांक १६ पासून पूर्णपणे बंद केला जाईल.
जिल्ह्याच्या विकासाचा नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवावा
दिनांक १६ रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापतींच्या निवडीचा संदर्भ देत सामंत म्हणाले, नवीन पदाधिकारी आल्यानंतर त्यांनी जिल्ह्याच्या विकासाचा नवा आदर्श महाराष्ट्रासमोर ठेवावा. रत्नागिरी जिल्हा परिषदेने यापूर्वीच आपल्या कामाची चुणूक दाखवली आहे. स्व. अजितदादांच्या प्रेझेंटेशनचा उल्लेख करत ते म्हणाले, महाराष्ट्रातील सामान्य मुलांसाठी असलेल्या योजना शासनामार्फत पूर्ण केल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पात या योजनांसाठी तरतूद केली असून, याचे १०० टक्के श्रेय जिल्हा प्रशासन आणि जिल्हा परिषदेला जाते.
देवाला साक्षी ठेवून जनतेची सेवा करणे महत्त्वाचे
जिल्हा परिषदेच्या नवीन इमारतीचे कौतुक करताना त्यांनी लोकप्रतिनिधींना महत्त्वाचा सल्ला दिला. ‘या इमारतीतून समुद्र दिसतो हे भाग्याचे आहे, पण समुद्र बघण्यासोबतच आपल्याला जनतेची कामेही पूर्ण करायची आहेत. केवळ मंदिराचा जीर्णोद्धार करून उपयोग नाही, तर त्या देवाला साक्षी ठेवून जनतेची सेवा करणे महत्त्वाचे आहे,’ जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणीही समोर आले तरी शिवसेनेचा विजय निश्चित होता हा आत्मविश्वास आम्हाला होता, असेही त्यांनी यावेळी नमूद केले. जे काही जुन्या काळात झाले ते गंगेला मिळाले असे समजून, आता १६ तारखेपासून सर्वांनी केवळ विकासकामांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन त्यांनी केले.
हे सुद्धा वाचा : “परकीय थेट गुंतवणूक आकर्षित करण्यात महाराष्ट्र…”; उदय सामंत विधानसभेत काय म्हणाले?






