मुंबई : सातारा लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे श्रीनिवास पाटील यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पुन्हा लढण्यास नकार दिला आहे. त्यामुळे या जागेवर आता कोणाला उमेदवारी द्यायची? याबाबत महाविकास आघाडीमध्ये चर्चा सुरु आहे. भाजपकडून खासदार उदयनराजे भोसले यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात तितकाच ताकदवान उमेदवार उभा करण्याची महाविकास आघाडीची रणनीती आहे. याच रणनीतीचा भाग म्हणून कराडमध्ये महत्त्वाची बैठक पार पडली.
काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात सविस्तर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास एक तासापेक्षा जास्त वेळ बंद दाराआड चर्चा झाली. त्यामुळे आता साताऱ्यात राजे विरुद्ध बाबा अशी लढत होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातून लढण्यास श्रीनिवास पाटील यांनी नकार दिला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतून राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. यापैकी पृथ्वीराज चव्हाण यांचे नाव आता जवळपास निश्चित असल्याचे मानले जाते.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडी आणि साताऱ्याच्या जागेत काँग्रेस आणि शरद पवार गटात आदलाबदल होऊ शकते. पृथ्वीराज चव्हाण हे स्वच्छ चेहरा आहेत. तसेच त्यांचे स्थानिक पातळीवर सर्वांशी चांगले संबंध आहेत. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना साताऱ्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.