
उमेश कोल्हे हत्याकांडप्रकरणी मागील आठवड्यात एनआयएकडून विशेष एनआयए न्यायालयात 137 पानी आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यामध्ये एकूण 11 जणांवर भारतीय दंड संहिता आणि बेकायदा कारवाया प्रतिबंध कायद्यानुसार(युएपीए) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केमिस्ट उमेश कोल्हे यांनी भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ काही सोशल मीडिया पोस्ट शेअर केल्या होत्या. ज्याच्या रागातूनच उमेश कोल्हेंची हत्या तबलिगी जमातीच्या कट्टरपंथी इस्लामवाद्यांनी मोहम्मद पैगंबर यांच्या कथित अपमानाचा बदला घेण्यासाठी केल्याचा आरोप एनआयएने लावला आहे.
नुपूर शर्मा यांच्या समर्थनार्थ समाज माध्यमावर संदेश प्रसारीत केल्यामुळे अमरावती येथील व्यावसायिक उमेश कोल्हे यांची हत्या करण्यात आली. २१ जून रोजी अमित मेडिकल्सचे संचालक उमेश कोल्हे हे दुकान बंद करून मोटर सायकलने घरी जात असताना रात्री साडे १० च्या सुमारास चाकूने वार करून त्यांची हत्या करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) या प्रकरणाचा तपास सोपविण्यात आल्यानंतर ११ जणांना अटक करण्यात आली असून दोन आरोपी अद्यापही फरार आहेत.