शिरूरमध्ये अपघातांचा धोका वाढला; बेशिस्त ऊस वाहतुकीकडे पोलिस प्रशासनाचे दुर्लक्ष
पुणे : शिरूर शहर व तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवरून जाणाऱ्या अवजड ऊस वाहतुकीमुळे अपघातांचा धोका वाढला आहे. उंचच्या उंच भरलेले उसाचे ट्रक, बेशिस्त वाहनचालकांची बेफिकीर वागणूक आदींमुळे अष्टविनायक महामार्ग व परिसरातील रस्ते अपघातांचे केंद्र बनत आहेत. याकडे पोलिस प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रक आणि ट्रॅक्टरमधून अत्यंत अवजड प्रमाणात ऊस वाहून नेला जात आहे. मलठण व कवठे येमाई येथील आठवडे बाजार रस्त्याच्या लगतच भरत असल्याने या दिवशी नागरिकांना जीव मुठीत घेऊन भाजीपाला खरेदी करावा लागतो. नियमानुसार ऊस वाहतूक करताना ट्रकच्या उंची आणि वजनाला मर्यादा असतानाही संबंधित मालक व चालक याकडे दुर्लक्ष करत आहेत. तसेच प्रशासनाकडून कारवाई न करता सोईस्कर दुर्लक्ष केले जात आहे, प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
रस्ता ओलांडताना धोका निर्माण
तालुक्यातील ग्रामीण भागात खुलेआम सुरू असलेला अवैध दारू व्यवसाय हा रस्ते सुरक्षेवर मोठा परिणाम करत आहे. मद्यधुंद वाहनचालक रात्री-अपरात्री बेशिस्तपणे वाहने चालवतात. यामुळे स्थानिक नागरिकांना रात्री प्रवास करताना किंवा रस्ता ओलांडताना धोका निर्माण होत आहे. शिरूर शहर व ग्रामीण भागातील अवजड ऊस वाहतूक, अवैध दारू व्यवसाय, बेशिस्त मद्यधुंद वाहनचालक यांमुळे अपघाताच्या घटना वाढत आहे. त्यामुळे स्थानिकांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
मद्यधुंद वाहनचालकांमुळे अनेक अपघात
रस्त्याची सुधारणा करण्याची मागणी
पोलिसांनी गस्त वाढवून मद्यधुंद वाहनचालकांवर कारवाई करावी. अवैध दारू व्यवसायावर कठोर पावले उचलावीत. ऊस वाहतुकीवर तातडीने नियंत्रण आणावे. उसाच्या अधिक वजन व उंचीच्या गाड्यांवर कारवाई करावी. प्रशासनाने रस्त्यावरील अपघाताची ठिकाणे तपासून रस्त्याची सुधारणा करावी, आदी मागण्या परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत.