वर्धनगड : केंद्र आणि राज्य शासनाच्या चुकीच्या धोरणामुळे शिक्षण क्षेत्राची परिस्थिती अत्यंत दैयनीय झाली आहे.शिक्षणाचा दर्जा सुमार झाला आहे. प्रधानमंत्रीच्या २०४७ पर्यंत आपला देश विकसित भारत करण्याच्या केवळ घोषणाबाजीने आपला देश विकसित भारत होणार नाही. सध्याच्या शासनाचे धोरण असेच राहिले तर शिक्षणाचा दर्जा सुधारणार नसून आपण जगाच्या स्पर्धेत टिकणार नाही.दरवर्षी दुप्पटीने होणाऱ्या पदवीधरांच्या हाताला काम आणि नोकऱ्या शासनाकडे आजमितीला नाहीत.म्हणूनच समाजातील सेवाभावी संस्था, मोठमोठे उद्योगपती किंवा ज्यांना मदत करायची आहे त्यांनी शिक्षणा साठी मदत करा ,तुमच्या सेवाभावी वृत्तीने दिलेल्या दानातूनच अद्यावत शैक्षणिक संस्था उभ्या राहतील असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
पुसेगाव ता खटाव येथील सेवागिरी शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या राधाकृष्णन इंग्लिश मिडीयम स्कुलच्या नूतन वास्तूच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.यावेळी मठाधिपती प पु सुंदरगिरी महाराज, दानशूर व्यक्तिमत्त्व अनिल द्विवेदी, संस्थेचे अध्यक्ष डॉ सुरेश जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव, सचिव मोहनराव जाधव, देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रणधीर जाधव, विश्वस्त संतोष उर्फ बाळासाहेब जाधव, संचालक विश्वनाथ जाधव, सुभाषराव जाधव, लक्ष्मण जाधव, विलासराव जाधव, डॉ. सुभाष आगाशे, विष्णुपंत खटावकर, योगेश देशमुख, सूर्यकांत जाधव, ऍड. विजयराव कणसे, मानाजीकाका घाडगे, महेश नलवडे, राजेंद्र घाडगे, गावोगावचे सरपंच, उपसरपंच तसेच प्राचार्य सुधाकर माने, मुख्याध्यापिका हेमलता देशमुख, पालक, विद्यार्थी व शिक्षकवृंद उपस्थित होते.
डॉ. सुरेश जाधव म्हणाले,१९६५ साली या संस्थेची स्थापना झाली तेव्हापासून गावातील व भागातील विद्यार्थ्यांची जडणघडण करण्यासाठी या संस्थेतील प्रत्येक घटकाने प्रामाणिक प्रयत्न केल्याने आज विद्यार्थी विविध क्षेत्रात चांगल्या पदावर कार्यरत आहेत.अजूनही ही संस्था परिसरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहचवण्यासाठी अविरत कष्ट करणार आहे, सध्या राज्यात अनेकांचे हात भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत पण आज या नूतन इमारतीचे उद्घाटन एक स्वच्छ कारभार करणाऱ्या अद्यापही कोणत्याही ईडी बीडी पासून कोसोदूर असलेल्या व्यक्ती कडून होत आहे याचा पुसेगाव परिसराला अभिमान आहे.
दरम्यान उपाध्यक्ष बाळासाहेब जाधव यांनी प्रास्ताविक केले. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या तसेच या शाळेच्या गुणगौरव प्राप्त विद्यार्थ्यांना व पालकांना प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.सौ हेमलता देशमुख यांनी आभार मानले.