पुणे : मशिदींवरील भोंग्यांविरोधात मनसेने पुकारलेल्या आंदोलनापासून दूर असलेले पुण्यातील नेते वसंत मोरे हे अखेर मैदानात उतरणार आहेत. राज ठाकरे यांच्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा आदेशाशी विसंगत भूमिका घेतल्यामुळे वसंत मोरे चर्चेत आले होते. त्यानंतर राज ठाकरे यांचा पुण्यातील दौरा आणि अलीकडे झालेल्या आंदोलनापासूनही वसंत मोरे अंतर राखून होते. त्यामुळे वसंत मोरे हे मनसेत अस्वस्थ असल्याच्या चर्चांना ऊत आला होता.
दरम्यान आता राज ठाकरे यांच्या पुणे दौऱ्यापूर्वी वसंत मोरे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. वसंत मोरे यांनी शनिवारी पुण्यात महाआरतीचे आयोजन केले आहे. मोरे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकून यासंदर्भात माहिती दिली आहे. आज कात्रजला संध्याकाळी सहा वाजता ऑफिस समोरील हनुमान मंदिरात मी महाआरती करतोय. यावं तर लागतयचं नक्की या मी वाट बघतोय, असा मजकूर या पोस्टमध्ये लिहला आहे. कात्रज परिसरात या महाआरतीसाठी स्टेज उभारण्यात आले आहे. याशिवाय, बॅनर्स लावून महाआरतीच्या कार्यक्रमाची जाहिरातही करण्यात आली आहे. त्यामुळे आता या महाआरतीच्या मुद्द्यावरून पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी या महाआरतीला परवानगीही दिली आहे.
[read_also content=”जादा नफा मिळवून देण्याचे सांगत २१.६६ लाख रुपयांची फसवणूक https://www.navarashtra.com/maharashtra/fraud-of-rs-21-66-lakh-claiming-extra-profit-nrdm-277197.html”]
वसंत मोरे हा मनसेचा पुण्यातील प्रमुख आणि आक्रमक चेहरा आहे. मध्यंतरी झालेल्या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, आता वसंत मोरे स्वत: महाआरती करणार असल्याने पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य फुंकले जाण्याची शक्यता आहे.