
फोटो सौजन्य - Social Media
Washim News : वाशिमचा दिव्यांग बालवैज्ञानिक विराज याने राष्ट्रीय स्तराकडे वाटचाल करत राज्यस्तरीय मंचावर आपल्या संशोधनाची जोरदार छाप पाडली आहे. इंन्सपायर मानक टीमने त्याच्या विज्ञान प्रकल्पासह समुपदेशक क्षेत्रातील कार्याचेही विशेष कौतुक केले. त्यामुळे वाशिमकरांचा अभिमान वाढवणारा हा क्षण ठरला आहे.
दि. २७ ते २९ दरम्यान भंडारा जिल्ह्यातील शहापूर येथे राज्यस्तरीय इंन्सपायर प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. जिल्हास्तरावर विजय मिळवून आलेल्या ३७५ पेक्षा जास्त प्रकल्पांमधून केवळ ३४ प्रतिभावंतांची निवड करण्यात आली. विशेष म्हणजे हा दोन वर्षांचा संयुक्त राज्यस्तरीय प्रदर्शन राउंड असल्याने स्पर्धा अधिक कठीण होती. त्या कठीण स्पर्धेत वाशिमचा एकमेव दिव्यांग विद्यार्थी म्हणून विराजने चमकदार कामगिरी केली.
विराजच्या पाठीशी उभे राहिले वाशिमकर
विराजच्या प्रकल्पाचा प्रवास संघर्षमय होता. मागील शाळेकडून मिळालेला असहकार, मार्गदर्शकांचा अभाव, वेळेची निकड आणि प्रचंड ताण यामुळे तो काहीसा खचला होता. मात्र या कठीण काळात सामान्य वाशिमकर मदतीस पुढे आले.
शिक्षणाधिकारी मंगला धुपे, संजय ससाणे, उपशिक्षणाधिकारी गजानन डाबेराव, वर्ल्ड स्कूलचे संचालक बाजड व मुख्याध्यापक सुतावणे, माजी प्राचार्य व शास्त्रज्ञ विजय भड, आर. ए. कॉलेजचे प्रा. गवळी व प्रा. ठाकूर, ‘रत्नप्रभा आ.रो मशिन शॉप’चे निशांत पाखरे, ‘शंकर अॅग्रो इंडस्ट्रिज’चे कापसे बंधू, जिल्हा रुग्णालयातील रामकृष्ण धाडवे, बि. आर. डी. एस. अकोल्याचे विशाल व अजय वाघचौरे, ‘भवानी स्टिल मेकर’ देसाई, परळीकर आदी अनेकांनी काहींनी विनामूल्य तर काहींनी अल्पदरात साहित्य उपलब्ध करून देत त्याच्या संशोधनाची वाट मोकळी केली.
इंन्सपायर समन्वयक विजय भड यांचे मार्गदर्शन
इंन्सपायरचे समन्वयक विजय भड यांनी विराजला योग्य मार्गदर्शन देत त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवला. संशोधनावर झालेल्या टीकेकडे न पाहता त्यांनी त्याला प्रोत्साहन देत पुढे जाण्यास प्रेरित केले. या सर्व मदतीमुळेच माझे स्वप्न प्रत्यक्षात आले, “माझ्या यशात वाशिमकरांचा मोठा वाटा आहे”, असे विराजने सांगितले.
कौटुंबिक आधारामुळे वाढली जिद्द
शंतनु शिंदे, तसेच विराजचे माता-पिता यांनी त्याच्या प्रत्येक प्रयोगाला योग्य वेळी साथ दिली. मानसिक आधार, प्रेरणा आणि आवश्यक निर्णयांमध्ये त्यांनी दाखवलेली भूमिका विराजच्या यशात महत्त्वाची ठरली.
“आता महाराष्ट्रासाठी जबाबदारीने काम करणार” — विराज
राज्यस्तरीय कामगिरीनंतर आता राष्ट्रीय स्तरावरही मी महाराष्ट्राचे नाव गौरवाने उंचावू इच्छितो, अशी भावना विराजने व्यक्त केली. “माझ्यावर आता अधिक जबाबदारी आहे. मी प्रामाणिकपणे, संशोधनभाव जपून पुढे काम करणार,” अशी त्याची ठाम भूमिका आहे.