सिंधुदुर्ग : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानास प्रारंभ झाला आहे. मतदानासाठी जिल्हा प्रशासनाची सज्ज आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण 918 मतदान केंद्रावर 6 लक्ष 64 हजार 566 मतदार आपला मताधिकार बजावणार आहेत. सिंधुदुर्गात 918 मतदान केंद्रावर शांततेत मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. सायंकाळी सहापर्यंत मतदान होणार असून मतदारांनी मोठ्या संख्येने आपल्या मतदानाचा हक्क बजावायला हवा असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी केले आहे.
जिल्ह्यातील 918 मतदान केंद्रावर मतदान पार पडणार आहे. 127 सेक्टर ऑफिसर आणि पोलीस सेक्टर ऑफिसर मतदानर केंद्रावर कायदा आणि सुव्यवस्था पाहणार आहेत. 459 मतदान केंद्रावर वेब कास्टींगच्या माध्यमातून नजर ठेवल्या जाणार आहे. 92 मतदान केंद्रावर सुक्ष्म निरीक्षक (Micro Observer) असणार आहेत. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी किशोर तावडे यांनी जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करताना आपल्या संदेशात जनतेने मोठ्या संख्येने मतदान केंद्रावर पोहोचावे, अशी विनंती केली आहे. मतदान केंद्रावर उन्हापासून बचावासाठी प्रतिक्षालय उभारण्यात आली असून पिण्याच्या पाण्यासह आवश्यकतेनुसार आरोग्य विषयक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. अनेक दिवसांपासून शासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी कार्यरत असून मंगळवारची सुटी मतदानासाठीच उपयोगात आणा असेही त्यांनी आवाहन केले आहे. उद्या संनियंत्रण कक्षातून जिल्ह्यातील सर्व यंत्रणेवर आपले लक्ष राहणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राहावी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. यामध्ये 171 पोलीस अधिकारी, 2042 पोलीस अंमलदार, 881 होमगार्ड, सीएपीएफची 1 कंपनी , एसआरपीएफच्या 3 कंपन्या, एक क्युआरटी तैनात करण्यात आलेल्या आहेत.
6 लाख 64 हजार 566 मतदार
जिल्ह्यातील कणकवली विधानसभा मतदार संघात एकूण 2,27,735 (पुरूष 1 लाख 12 हजार 842 – स्त्री 1 लाख 14 हजार 893 ), कुडाळ विधानसभा मतदार संघात एकुण 2,12,360 (पुरूष 1 लाख 5 हजार 951- स्त्री 1 लाख 6 हजार 408, तृतीय पंथी 1) सावंतवाडी 2,24,471 (पुरूष 1 लाख 12 हजार 795- स्त्री 1 लाख 11 हजार 676) असे एकूण 6 लाख 64 हजार 566 मतदार यावेळी मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. सावंतवाडी, कुडाळ आणि कणकवली विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक असे सखी मतदान केंद्र, युवक मतदान केंद्र, दिव्यांग मतदान केंद्र आणि परदानशीन मतदान केंद्र असणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे यांनी सांगितले.