नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रचारतोफा रविवारी सायंकाळी थंडावल्या. उद्या (दि.7) मतदान होणाऱ्या या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांसह देशातील 10 राज्ये, दोन केंद्रशासित प्रदेशांतील एकूण 94 जागांचा समावेश आहे. गुजरातमधील सर्व 26 जागा या टप्प्यातच आटोपणार आहेत.
याशिवाय कर्नाटक 14, महाराष्ट्र 11, उत्तर प्रदेश 10, मध्यप्रदेश 8, छत्तीसगड 7, बिहार 5, आसाम 4 आणि गोव्यातील 2 जागांवर मतदान होत आहे. सोबतच दादरा व नगर हवेली आणि दमन व दीवच्या प्रत्येकी दोन जागांवर या टप्प्यात मतदान होईल.
सांगली, माढा, कोल्हापूर, रत्नागिरीसह 11 जागा
लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 11 जागांवर मतदान होत आहे. यात बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, कोल्हापूर, हातकणंगले, रायगड, उस्मानाबाद, रत्नागिरी सिंधुदुर्ग, लातूर हे मतदारसंघ आहेत. यातील सर्वाधिक लक्षवेधी लढत बारामतीत होत आहे. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार यांच्यातील लढतीकडे अवघ्या देशाचे लक्ष लागले आहे.
भाजपच्या गोटात खळबळ
भाजपाच्या गोटात खळबळ उडाली आहे. कोल्हापुरातही वारसाहक्कावरून राजकीय फैरी झडल्या होत्या. तिसऱ्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरेंसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज ठाकरे यांच्या सभांनी राजकीय वातावरण तापले होते.