
फोटो सौजन्य सोशल मिडिया
दापोली अर्बन सायन्स कॉलेज जवळ असलेली ही मोक्याची जागा मूळ मालक काझी रहमान काझी इसा यांनी 14 सप्टेंबर 1897 रोजी मृत्युपत्राद्वारे मुस्लिम समाजाच्या धार्मिक आणि शैक्षणिक तसेच वैद्यकीय वापरासाठी वक्फ साठी दान केली होती. 1955-56 मध्ये या संस्थेची सार्वजनिक ट्रस्ट म्हणून नोंदणी झाली. दरम्यान, 1995 मध्ये वक्फ कायदा अस्तित्वात आल्यानंतर नियमानुसार ही जागा वक्फ बोर्डाच्या अखत्यारीत येणे बंधनकारक होती. तरी सुद्धा दापोली परिसरातील एका वजनदार सत्ताधारी राजकीय नेत्याने आपल्या नातेवाईक आणि निकटवर्तीयांना हाताशी धरून धर्मादाय आयुक्तांच्या अधिकाराचा गैरवापर करत कागदोपत्री गुंतागुंत निर्माण करून ही जागा अत्यंत कवडीमोल भावाने स्वतःच्या ताब्यात घेतली आहे.
मागील काही वर्षांत या नेत्याने जमिनीचे हस्तांतरण स्वतःच्या नावे करून घेतले. तसेच मूळ प्रचलित ‘उदयनगर’ या परिसराचे नाव बदलून आपल्या भागीदाराच्या नावे ‘भाऊ मोहिते नगर’ असे अनधिकृतपणे नामकरण करण्यात आले आहे.व स्थानिक नगरपंचायतीकडून संगनमताने प्लॉटिंगच्या परवानग्या मिळवून कोट्यवधी रुपयांना प्लॉटची विक्री करण्यात आली आहे. या संपूर्ण बेकायदेशीर व्यवहाराकडे संबंधित प्रशासकीय यंत्रणांनी राजकीय दबावापोटी डोळेझाक केल्याचा आरोप केला जात आहे. स्थानिक सजग सामाजिक कार्यकर्त्यांनी या गैरव्यवहाराची कागदपत्रे वक्फ बोर्डाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बोर्डाने याची अत्यंत गंभीर दखल घेतली.
महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या नोंदणीनुसार (क्र. MSBW/RTG/२८४/२०२५) वक्फ कायद्याच्या कलम ५१ आणि ५६ चे उल्लंघन करून ही मालमत्ता हडपल्याचे स्पष्ट झाले आहे. बोर्डाच्या परवानगीशिवाय कोणत्याही वक्फ मालमत्तेची विक्री, गहाण किंवा ताबा घेणे कायद्यान्वये पूर्णतः बेकायदेशीर आहे. यात कलम ५२-अ नुसार अशा कृत्यासाठी दोन वर्षांपर्यंतच्या कारावासाची तरतूद केली आहे. सदर जमीन वक्फच्या ताब्यात का घेण्यात येऊ नये आणि संबंधितांवर फौजदारी गुन्हे का दाखल करण्यात येऊ नयेत, याबाबत ७ दिवसांच्या आत खुलासा करण्याचे आदेश वक्फ बोर्डाने दिले आहे.
आगामी काळात नोटीस मिळालेल्यांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सध्या सत्ताधारी पक्षातील वजनदार मंडळींकडून हे प्रकरण दडपण्याचे जोरदार प्रयत्न सुरू आहे. राजकीय आशीर्वादाने बळकावलेल्या सर्व जमिनींची सखोल चौकशी व्हावी अशी तीव्र मागणी दापोलीतील नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. राष्ट्रवादीचे (शरद पवार गट )पदाधिकारी जाकीर शेकासन यांनीही जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित बिल्डर लॉबी वरती गुन्हे दाखल करावे अशी मागणी केली आहे.