
Wardha News: वर्ध्यातील 14 धार्मिक स्थळांना तीर्थक्षेत्राचा 'क' दर्जा; पर्यटन व विकासाला मिळणार चालना
वर्धा: जिल्ह्याच्या धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन विकासाला चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीत वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 14 देवस्थाने, यात्रास्थळे आणि तीर्थक्षेत्रांना ‘क’ वर्गाचा दर्जा देण्यास मंजुरी देण्यात आली. या निर्णयामुळे भाविकांसाठी मूलभूत सुविधा वाढण्याबरोबरच धार्मिक पर्यटन आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
‘क’ वर्गाचा दर्जा मिळालेल्या स्थळांमध्ये समुद्रपूर तालुक्यातील शेडगाव (चौ.) येथील सदुरू जगन्नाथ बाबा चॅरिटेबल ट्रस्ट, वर्धा तालुक्यातील नालवाडी येथील संत नरहरी महाराज देवस्थान ट्रस्ट, देवळी तालुक्यातील इंझाळा येथील महादेव मंदिर, तळेगाव (टा.) येथील विठ्ठल-रखुमाई देवस्थान, सावंगी (मेघे) येथील श्री महादेव मंदिर, बोरगाव (मेघे) येथील आई तुळजाभवानी (सुपारी माता) मंदिर, शिरपूर येथील संत पैगाजी महाराज देवस्थान, आलोडी येथील स्वामी समर्थ सेवा व बाल संस्कार परिसर, दोडकी येथील विठ्ठल-रुख्माई मारुती देवस्थान, आलोडी अंजनामाता चॅरिटेबल ट्रस्ट, महाकाळ येथील संत तुकडोजी महाराज देवस्थान, आलोडी येथील पवनसुत हनुमान मंदिर, म्हसाळा येथील श्री संत जगन्नाथ महाराज मंदिर आणि नाचणगाव येथील विठ्ठल-रुख्माई देवस्थानांचा समावेश आहे.
या निर्णयासोबतच वर्धा शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य स्मारक उभारण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या सांस्कृतिक ओळखीला अधिक बळ मिळणार असून साहित्य, कला आणि सामाजिक चळवळींच्या इतिहासाला जपण्याचा प्रयत्न होणार आहे.
जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी या निर्णयाचे स्वागत करत सांगितले की, तीर्थक्षेत्रांना ‘क’ दर्जा मिळाल्यामुळे भाविकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्यास मदत होईल. रस्ते, पिण्याचे पाणी, स्वच्छता, निवास व्यवस्था आणि इतर सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाकडून अधिक प्रभावी नियोजन करता येईल. यामुळे धार्मिक पर्यटनाला चालना मिळून स्थानिक रोजगाराच्या संधीही वाढतील.
ते पुढे म्हणाले की, ग्रामीण भागातील धार्मिक स्थळांचा विकास म्हणजे केवळ श्रद्धास्थानांचा विकास नसून स्थानिक अर्थव्यवस्था, पर्यटन आणि सांस्कृतिक वारसा जपण्याच्या दृष्टीनेही हा महत्त्वाचा टप्पा आहे. या निर्णयामुळे वर्धा जिल्ह्यातील विविध धार्मिक स्थळांची ओळख राज्यभर आणि देशभर पोहोचण्यास मदत होईल. तसेच भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन आवश्यक सुविधा उभारण्यासाठी प्रशासनाला अधिक गतीने काम करता येणार असल्याने जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला या निर्णयाचा सकारात्मक हातभार लागणार आहे.