टाटा पॉवर प्रकल्पात कामगारांचा संताप; ‘काळी दिवाळी’ साजरी करून प्रशासनाला इशारा
म्हसवड : टाटा पॉवर रिन्यूएबल एनर्जी लिमिटेडच्या पळसावडे प्रकल्पातील भूमिपुत्र कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे कंपनी व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी एक अनोखे आंदोलन केले. पारंपरिक आनंदाऐवजी ‘काळी दिवाळी’ साजरी करून कामगारांनी आपल्या संतापाला वाट मोकळी करून दिली.
काळी रांगोळी, काळे फडके, काळा फराळ आणि कपाळावर काळा नाम लावून कामगारांनी प्रकल्पाच्या प्रवेशद्वारासमोर आपली एकजूट दाखवली. ‘कामगार एकजुटीचा विजय असो’ आणि ‘टाटा पावर प्रशासन जागे व्हा ‘ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. या आंदोलनाचे नेतृत्व सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी केले. त्यांनी सांगितले की, ‘कामगारांच्या घामावर कंपनी नफा कमावते, पण त्यांच्या हक्कांकडे मात्र वारंवार दुर्लक्ष करते. आजची काळी दिवाळी म्हणजे अन्यायाविरोधात उभारलेला आवाज आहे. कामगारांना त्यांच्या घामाचा आणि हक्काचा सन्मानजनक दाम न मिळाल्यास यापुढील आंदोलन आणखी तीव्र करू. परंतु कामगारांना संपूर्ण न्याय मिळेपर्यंत थांबणार नाही’.
कामगारांनी यावेळी कंपनीच्या अधिकाऱ्यांना प्रतिकात्मक ‘काळा फराळ’ भेट दिला आणि मागण्यांवर त्वरित निर्णय घेण्याची मागणी केली. याआधी १५ ते १९ ऑगस्टदरम्यान सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण केले होते, तर १८ ऑगस्ट रोजी ‘दंडवत आंदोलन’ करूनही लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यावेळी जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने टाटा पावर प्रशासनाने २९ ऑगस्ट २०२५ पर्यंत कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्या आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळेच कामगारांचा रोष पुन्हा उफाळला आहे.
पगारवाढ, आरोग्य विमा मिळावा
कामगारांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पगारवाढ, आरोग्य विमा सुविधा, आणि कल्याणकारी योजना तातडीने लागू करणे यांचा समावेश आहे. स्थानिक नागरिकांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला असून, परिसरात कामगारांच्या प्रश्नांबाबत चर्चा सुरू झाली आहे. टाटा पावर पळसावडे प्रकल्पातील ‘काळी दिवाळी’ने कंपनी प्रशासनाच्या दाव्यांना आणि आश्वासनांना प्रश्नचिन्ह निर्माण केले असून, पुढील काही दिवसांत या संघर्षाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.