सिंधुदुर्गनगरी/ संजय वालावलकर : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई निवारण्यासाठी 12 गावं आणि 302 वाड्यांचा समावेश आहे. यासाठी 5 कोटी 78 लाख 95 हजार रुपयाचा पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला आहे. याबाबत प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हा पाणीपुरवठा विभागाने जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक असल्यामुळे तसेच जिल्हा परिषद प्रशासनाकडून कच्चे व वनराई बंधारे बांधण्याची मोहीम दरवर्षी हाती घेतली जाते. मात्र गेल्या काही वर्षात जिल्ह्यात पाणीटंचाईची समस्या जाणवली नाही. त्यामुळे या मोहिमेबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केले होते . सद्यस्थितीत हवामानातील बदल आणि वाढलेला उष्मा पाहता पाण्याची पातळी घटून जिल्ह्यातील काही गाव व वाड्यांमध्ये पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.
याकरिता जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांना संभाव्य पाणी टंचाई आराखडा तयार करून जिल्हा परिषद प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते.प्राप्त अहवालानुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयांचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा तयार करण्यात आला असून प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात आला आहे.
या आराखड्यामध्ये नळ पाणीपुरवठा विशेष दुरुस्ती करणे १२ गावे २४ वाड्यांसाठी ३ कोटी ३५ लाख, विंधन विहिरी विशेष दुरुस्ती करणे ३३ वाड्यांसाठी ९ लाख ८० हजार, नवीन विंधन विहीर घेणे १२५ वाड्यांसाठी १ कोटी २५ लाख, तात्पुरती पूरक नळ योजना घेणे १२ वाड्यांसाठी ५६ लाख ५० हजार, विहीर खोल करणे गाळ काढणे विहीर दुरुस्त करणे १०८ वाड्यांसाठी ५२ लाख ६५ हजार, अशा प्रकारे जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाईची शक्यता असलेल्या १२ गावे व ३०२ वाड्यांचा समावेश असलेला ५ कोटी ७८ लाख ९५ हजार रुपयाचा संभाव्य पाणीटंचाई आराखडा ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने तयार केला असून अंतिम प्रशासकीय मंजुरीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केला असल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली.