
Uddhav Thackeray Criticized Devendra Fadnavis : “देवेंद्र फडणवीस म्हणाले, उद्धव ठाकरेंचे एक असे भाषण दाखवा, ज्यात ते विकासावर बोललेत, मी हजार रुपये देतो. नको, मला चोरीचा पैसा नको. पण देवेंद्र फडणवीस मी तुम्हाला आव्हान देतो. तुमच्या मोदींपासून तुमचं आणि तुमच्या चेल्या चपाट्यांचं, अगदी वर्गाच्या मॉनिटरची निवडणूक असली तरी, हिंदू मुस्लिम न करता केलेलं भाषण दाखवा आम्ही सगळे तुम्हाला एक लाख रुपये देतो.” अशा शब्दांत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खुले आव्हान दिले आहे.
राज्यात जवळपास पाच ते सहा वर्षांनी महापालिका निवडणुका होत आहे. त्यामुळे यावेळी महापालिकांच्या निवडणुकांची रंगत चांगलीच वाढली आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप-शिंदेसेना युतीविरूद्ध ठाकरे बंधुंची आघाडी अशी लढत होणार आहे. यासाठी राज्यभरात जोरदार प्रचार सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील शिवतीर्थावर काल ठाकरे बंधुंची संयुक्त सभा पार पडली. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आक्रमक भाषणानंतर उद्धव ठाकरे यांनी भाषण केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस सरकारला आगपाखड केली.
आम्ही म्हणतोय मुंबई महापालिकेवर मराठी महापौर होणार, पण भाजप म्हणते हिंदू महापौर होणार. मग देवेंद्र फडणवीस हिंदू आहेत की नाहीत असा माझा प्रश्न आहे. त्यांनी एकदा स्वत:चं डोक आणि सर्टिफिकेट तपासून पाहावं.” असा टोला त्यांनी लगावल. उद्धव ठाकरे म्हणाले, निवडणूक महापालिकेची आहे. पण भाजप काय प्रचार करत आहेत. प्रत्येक निवडणूक आली की भाजप हिंदू मुस्लिम सुरू होते. संयुक्त महाराष्ट्रासाठी माझ्या आजोबांनी आणि इतरांनी मिळून जी समिती स्थापन केली होती. त्यात जनसंघ कुठेही नव्हता. सगळे पक्ष एककत्र आले. मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, अशी आक्रमक मागणी केली. त्यावेळीही गुजरातचा डोळा मुंबईवर होता. त्यावेळी मोरराजी देसाई मुख्यमंत्री होते. त्यावेळी मोरारजी देसाई यांनीच दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश दिले होते. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात मरणारी मराठी माणसेही होती. पण त्यात जनसंघ कुठेही नव्हता. म्हणजे गोळीला तुम्ही आणि पोळीला आम्ही.
राज्यात सगळीकडे अदानीकरण सुरू आहे. मुंबादेवीच्या नावावरून आम्ही मुंबई असं नाव ठेवल, पण आता मुंबईचं त्यांना बॉम्बे करायचा प्लॅन आहे का,अशी चिंता मला वाटत आहे. त्या अण्णामलाईचं मला आभारच मानले पाहिजेत कारण तो भाजपच्या मनात असलेला प्लॅन नकळत का असेना पण बोलून गेला. लोकसभा निवडणुकीत भाजपने अबकी बार ४०० पार चा नारा दिला होता. पण ४०० पार का, तर संविधान बदलण्यासाठी, असं त्यांच्याच खासदाराने बोलून दाखवलं होतं.
भाजपला मुंबई का हवी आहे, याचे कारण स्पष्ट करताना शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खळबळजनक दावा केला. “ दिल्ली ही व्हेंटिलेटरवर आहे, तर मुंबई आयसीयूमध्ये आहे. आज ९० टक्के मुंबई खोदलेली आहे. इकडून-तिकडून मेट्रो, इकडून बोगदा, तिकडून रस्ता खोदलाय, चालायला जागा नाही. चौफेर मुंबईत धुळ आणि प्रदुषण पसरले आहे. त्या प्रदुषणातही भ्रष्टाचार आहे. भाजपला मुंबई अदानींच्या घशात घालायची आहे. सध्या मुंबईतील बांधकामांसाठी लागणाऱ्या सिमेंटपैकी सुमारे ७० टक्के सिमेंट अदानी समूहाकडून घेतले जात असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. त्यामुळे मुंबईतील विकासकामांच्या माध्यमातून कोणाचे हित जपले जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविषयी केलेल्या आरोपांवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला. “अजित पवारांवर आरोप करताना तुमच्याकडे पुराव्यांच्या गोण्या असल्याचे तुम्ही सांगितले होते. आता त्या पुराव्यांचे काय झाले? त्या पुराव्यांचे पुढे काय करणार आहात? ते जाळून टाकायचे का? जर त्या पुराव्यांमध्ये खरोखरच तथ्य असेल, तर अजित पवारांना सत्तेतून बाहेर काढा. आणि जर पुरावे नसतील, तर जाहीरपणे त्यांची माफी मागा,” अशी ठाम मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.