
माण तालुक्यातील मुरुमशेंडा वस्तीत विहिरी-बोअरवेलचे पाणी दूषित; लहान मुले, महिला-पुरुषांच्या अंगावर जखमा
म्हसवड : माण तालुक्यातील पानवन हद्दीतील मुरुमशेंडा वस्ती परिसरातील केमिकल कंपनीच्या सांडपाण्यामुळे पाणीस्रोत दूषित होत असल्याचा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरातील विहिरी व बोअरवेलचे पाणी दूषित झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, लहान मुले, महिला, पुरुष तसेच अपंग नागरिकांच्या शरीरावर जखमा व त्वचेच्या समस्या निर्माण झाल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्याचबरोबर दूषित पाण्यामुळे जनावरांच्या आरोग्यावर परिणाम होऊन काही जनावरांचा मृत्यू झाल्याचाही गंभीर आरोप करण्यात आला आहे.
याप्रकरणाची गंभीरता ग्रामपंचायत पानवनच्या अधिकृत नोटिशीमुळे आणखी वाढली आहे. ग्रामपंचायत व आरोग्य उपकेंद्र पुळकोटी यांच्या माध्यमातून तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या नमुन्यांमध्ये मुरुमशेंडा तलावानजीकची विहीर, दिलीप बाबा काळेल यांची खासगी विहीर, मारुती गुंडा नरळे यांची विहीर आणि हेमा शिवाजी नरळे यांची विहीर अशा चारही पाणीस्रोतांचे नमुने पिण्यास अयोग्य आल्याचे नोटिशीत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या स्रोतांतील पाणी पिण्यास वापरू नये, असा इशाराही ग्रामपंचायतीने दिला आहे.
ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार, कंपनीसाठी लागणारा काही कच्चा रासायनिक माल उघड्यावर ठेवण्यात येत असून, पावसाच्या पाण्यासोबत रासायनिक घटक मिसळलेले सांडपाणी जमिनीत मुरत आहे. त्याचा परिणाम परिसरातील विहिरी आणि बोअरवेलवर होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनल्याने नागरिकांचे आरोग्य आणि जनावरांचे जीवन धोक्यात आले असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
याप्रकरणी ग्रामस्थांनी यापूर्वी जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार, ग्रामपंचायत तसेच संबंधित विभागांकडे तक्रारी व निवेदने दिली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडूनही पाण्याचे नमुने तपासून शुद्ध पाणीपुरवठ्याबाबत उपाययोजना करण्याच्या दृष्टीने संबंधित यंत्रणेला कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते.
दरम्यान, महिलांनी कंपनी व्यवस्थापना विरोधात गंभीर आरोप करत पोलिसांकडेही तक्रार केली आहे. ग्रामस्थ महिलांना धमकावणे, अपमानास्पद भाषा वापरणे तसेच भीतीचे वातावरण निर्माण केल्याचे आरोप तक्रारीत करण्यात आले आहेत. या सर्व आरोपांची स्वतंत्र चौकशी होणे आवश्यक आहे.
प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेणार?
नागरिकांचे पाणी, आरोग्य आणि जनावरांचे जीव धोक्यात असल्याचे आरोप होत असताना प्रशासन आता नेमकी कोणती भूमिका घेणार? असा संतप्त सवाल मुरुमशेंडा ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ, आरोग्य विभाग, महसूल प्रशासन, ग्रामपंचायत आणि पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची संयुक्त व निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच नागरिकांना तातडीने सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी जोरदार मागणी होत आहे.
पाणी आमचा मूलभूत अधिकार; विषारी पाणी नको
मुरुमशेंडा परिसरातील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना प्रशासनाने केवळ कागदी कारवाई न करता प्रत्यक्ष घटनास्थळी पाहणी करून पाण्याचे स्वतंत्र नमुने तपासावेत, प्रदूषणाचा स्रोत निश्चित करावा, नागरिकांच्या आरोग्याची वैद्यकीय तपासणी करावी आणि दोष आढळल्यास संबंधित कंपनीवर कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.