कोल्हापूर दक्षिण : शारदीय नवरात्रोत्सवाच्या ललिता पंचमीनिमित्त भाविकांच्या गर्दीत त्र्यंबोली मंदिरात कोहळा फोडण्याचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. गुरव घरण्यातील कुमारिका सागरिका विक्रम गुरव हिला कोहळा फोडण्याचा मान मिळाला. कोहळा मिळवण्यासाठी मोठी गर्दी केली होती. त्यामुळं कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
शारदीय नवरात्रोत्सवाच्या आजच्या सहाव्या दिवशी ललितापंचमीनिमित्त भाविकांच्या अलोट गर्दीत टेंबलाई टेकडी येथील त्र्यंबोली मंदिरात कोहळा फोडण्याचा विधी उत्साहात पार पडला. वास्तविक दरवर्षी हा सोहळा नवरात्र उत्सवाच्या पाचव्या दिवशी येत असतो, मात्र यंदा उगवती तिथी सहाव्या दिवशी आल्याने हा सोहळा शनिवारी पार पडला. पालखी मार्गावर फुलांच्या पायघड्या घाल्याण्यात आल्या होत्या. भाविकांच्या सोयीसाठी मंडप उभारण्यात आला होता. संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणात नाहून निघाला होता.
ललिता पंचमीनिमित्त करवीर निवासिनी श्री अंबाबाई आपली प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीला जाते. आज सकाळी साडे दहा वाजता श्री अंबाबाई देवीची पालखी, तुळजा भवानी देवीची पालखी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची पालखी शाही लवाजम्याह त्र्यंबोली मंदिराकडे रवाना झाली. बिंदू चौक, बागल चौक, राजाराम रोड, टाकाळामार्गे ही पालखी हलगी, तुतारीचा गर्जनेत वाजत गाजत दुपारी साडे बारा वाजता टेंबलाई टेकडीवर पोहचल्या. युवराज संभाजीराजे छत्रपती, युवराज मालोजीराजे छत्रपती, शहाजीराजे छत्रपती, यशराजराजे छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत अंबाबाई व त्र्यंबोली भेटीचा सोहळा पार पडला. मंदिरासमोर मानाचा शेंदूर लावलेला पाषाण आणि कोहळा घोंगड्यावर ठेवला होता.
दोन्ही देवीच्या भेटीनंतर कोल्हासुराचे प्रतीक म्हणून गुरव घराण्यातील कुमारिका सागरिका विक्रम गुरव हिच्या हस्ते कोहळा फोडण्यात आला. कोहळा फोडताच कोहळ्याचा तुकडा मिळवण्यासाठी एकच झुंबड उडाली. नवरात्र उत्सवाच्या काळात ललितापंचमीचा सोहळा साजरा केला जातो. यादिवशी अंबाबाईची बहिण त्र्यंबोली तिच्यावर रूसल्यानं ती टेकडीवर गेली. तिची समजूत काढण्यासाठी अंबाबाई आजच्या दिवशी त्र्यंबोलीच्या भेटीला जाते अशी करवीर महात्म्यात आख्यायिका आहे. या आख्यायिकेनुसार गेल्या अनेक वर्षापासून अंबाबाई त्र्यंबोलीच्या भेटीचा सोहळा व कोल्हासुराच्या वधाचं प्रतिक म्हणून कोहळा फोडण्याचा विधी केला जातो. आज त्र्यंबोली देवीची सिहांसनारुढ पूजा बांधण्यात आली होती.
सोहळ्यास जिल्हाधिकारी अमोल येडगे, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे, व्यवस्थापक महादेव दिंडे, माजी उपमहापौर सुलोचना नाईकवाडे, माजी नगरसेविका शोभा कावळे आदी उपस्थित होते. संपूर्ण शांततेत आणि भक्तिमय वातावरणात हा सगळा सोहळा पार पडला. या निमित्ताने टेंबलाई टेकडीवर यात्रा भरली होती.