बिहार विधानसभेसाठी दिग्गजांची फौज मैदानात; काय आहे भाजपचा ' स्पेशल ४५' प्लॅन?
Bihar Assembly Election 2025: बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्भूमीवर भाजपच्या गोटात मोठ्या हालचालींना सुरूवात झाली आहे. भारतीय जनता पक्षाने (भाजप) निवडणुकीची तयारी तीव्र केली आहे. यावेळी, पक्षाने मतदान केंद्रापासून ते लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांपर्यंत मजबूत नेटवर्क तयार करण्यासाठी ४५ नेत्यांची विशेष फौज तैनात केली आहे. या नेत्यांना वेगवेगळ्या राज्यांमधून आणण्यात आले असून प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. येत्या काळात विधानसभा निवडणुकीच्या पातळीवरही नेत्यांना तैनात केले जाईल. या प्रत्येक नेत्यांना सहा विधानसभा मतदारसंघ देण्यात आले आहेत.
गृहमंत्री अमित शहा, बिहार निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान, सह-प्रभारी सी.आर. पाटील आणि केशव प्रसाद मौर्य आणि बिहार प्रभारी विनोद तावडे यांच्यासह अनेक वरिष्ठ नेते पटना येथील महत्त्वपूर्ण बैठकीत उपस्थित होते. या बैठकीत, प्रवासी नेत्यांना त्यांच्या कामांची माहिती देण्यात आली आणि मिशन बिहार जिंकण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आणि त्यांना वेगवेगळ्या भागात पाठवण्यात आले.
भाजपने बिहार विधानसभा निवडणुकीसाठी विशेष रणनीती आखली असून त्यासाठी ४५ प्रमुख नेत्यांची निवड करण्यात आली आहे. या यादीत खासदार, माजी खासदार, आमदार आणि संघटनात्मक पदाधिकारी यांचा समावेश असून, त्यांना विविध राज्यांतून जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
छत्तीसगडमधून खासदार संतोष पांडे, विजय बघेल आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष सरोज पांडे यांचा समावेश झाला आहे. दिल्लीसाठी खासदार रमेश बिधुरी, कमलजीत शहरावत आणि केंद्रीय मंत्री हर्ष मल्होत्रा यांची नेमणूक करण्यात आली आहे. गुजरातमध्ये खासदार देवुसिंह चौहान, मितेश पटेल आणि आमदार अमित ठाकरे यांना जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
हरियाणातून माजी खासदार सुनीता दुग्गल, जम्मू-काश्मीरमधून खासदार युगल किशोर शर्मा, झारखंडमधून खासदार मनीष जयस्वाल, कालीचरण सिंह, प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र राय आणि माजी खासदार सुनील सिंह यांचा समावेश आहे. ओडिशातून खासदार अनंत नायक यांना स्थान मिळाले आहे.
किती वेळ OLA-Uber ने फिरणार? नवीन GST मुळे ‘ही’ कार झाली अजूनच स्वस्त, यंदाच्या दसऱ्यात खरेदी कराच
मध्य प्रदेशातून गजेंद्रसिंह पटेल, बी.डी. शर्मा, अनिल फिरोजिया, केंद्रीय मंत्री प्रल्हाद पटेल, विश्वास सारंग तसेच माजी खासदार के.पी. सिंह यादव आणि अरविंदसिंह भदोरिया यांची नेमणूक झाली आहे. उत्तर प्रदेशातील खासदार सतीश गौतम, राजकुमार चहर, संगमलाल गुप्ता, माजी खासदार विनोद सोनकर, माजी मंत्री सतीशचंद्र द्विवेदी, नेते उपेंद्र तिवारी आणि आमदार सलभ मणी त्रिपाठी यांचा समावेश करण्यात आला आहे. राजस्थानमधील विरोधी पक्षनेते राजेंद्र राठोड यांचेही नाव या यादीत आहे.
याशिवाय, युवा आघाडीचे उपाध्यक्ष राम सातपुते यांच्यासह माजी खासदार, आमदार आणि वरिष्ठ संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनाही जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत.
भाजपच्या रणनीतीनुसार, पुढील आठवड्यात विधानसभा स्तरावरही नेत्यांची नियुक्ती होणार आहे. या प्रवासी नेत्यांची भूमिका केवळ प्रचारापुरती मर्यादित नसून, स्थानिक कार्यकर्त्यांना सक्रिय करणे आणि प्रत्येक मतदारसंघात एनडीएचा विजय सुनिश्चित करणे अशी असणार आहे. या “विशेष ४५” नेत्यांच्या जमिनीवरील उपस्थितीमुळे बिहार निवडणूक अधिक रंगतदार होणार असल्याचे बोलले जात आहे.