सातारा : जीवन जगताना माणसासमोर अनेक अडचणी येतात. त्या पार करत मार्गक्रमण करावे लागते. या अडचणी पार केल्यानंतर आपण जेव्हा यशाच्या शिखरावर पोहचतो, त्यावेळी आपल्यात मग्रुरी येता कामा नये. हे पथ्य पाळत असताना गरीब असलो तरी कोणापुढेही लाचार होता कामा नये. ध्येयाने जीवन जगत गेला तर कधीच मागे फिरण्याची वेळ येणार नाही, असे मत अभिनेते, दिग्दर्शक व सातारच्या लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी व्यक्त केले.
लालबहाद्दूर शास्त्री महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विजय मांडके, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ आर. व्ही. शेजवळ, प्राचार्य डॉ यशंवत पाटणे, शिरीष चिटणीस, श्रीकांत कात्रे, दीपक शिंदे यांच्यासह माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सयाजी शिंदे म्हणाले, विद्यार्थ्यांनी आयुष्यात प्रत्येक टप्प्यावर गुरु बदलला पाहिजे. ज्यांच्याकडून जास्तीत जास्त शिकता येईल, असा प्रयत्न व्हायला हवा. लाल बहाद्दूर शास्त्री महाविद्यायातच मिळालेले एक पुस्तक आणि एका भिक्याच्या भाकरीच्या भूमिकेने मला ५०० चित्रपट आणि आठ भाषांमध्ये आयुष्याची भाकरी मिळवून दिली. प्रत्येक भूमिका करताना ती अत्यंत तन्मयतेने करत गेलो. दिलेला शब्द आणि वेळ पाळत गेलो. त्याठिकाणी कोणाशीही प्रतारणा केली नाही.
माणसाचे आयुष्य हे दोन श्वासांमधील अंतर आहे. चांगला श्वास घेता आला पाहिजे आणि पुढच्या चांगल्या श्वासाची व्यवस्था केली पाहिजे. कोणी कितीही मोठा झाला तरी सर्व पुन्हा याच धरतीवर सोडून जाणार आहे. त्यामुळे श्रीमंती आणि त्याचा बडेजाव बाळगणारे हे बावळट आहेत, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.