राजापूर तालुक्याच्या डोंगराळ भागात अनेक ठिकाणी खडीचे क्रशर राजरोसपणे सुरु असताना, क्रशरची परवानगी आमच्या कार्यालयाकडुन दिल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हाला त्याबद्दल काहीच माहिती नाही अशी उत्तरे राजापूर तहसील आणि प्रांताधिकारी कार्यालयाकडून मिळत असल्याने या क्रशरवर नियंत्रण कुणाचे? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेतून विचारण्यात येत आहे.
तालुक्याच्या पश्चिम किनारपट्टीपासून अगदी सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यात अनेक ठिकाणी खडीचे क्रशर राजरोसपणे सुरु आहेत. प्रत्यक्षात जिल्हाधिकारी कार्यालयाकडून हे क्रशर परवाने दिले जात आहेत. त्यामुळे यावर नियंत्रण महसुल विभागाचे असले तरी राजापूर महसुल विभागात किती क्रशरना परवाने दिले गेले आहेत याचीच माहिती उपलब्ध नसल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे. पाचशे ब्रास पर्यंतच्या क्रशरना तहसीलदार यांच्याकडुन परवाने दिले जातात. तर पाचशे ब्रास ते एक हजार ब्रासचे परवाने प्रांताधिकारी यांनी द्यायचे असतात. मात्र राजापूर तालुक्यात चालणारे क्रशर हे हजार ब्रासच्या वरचे असल्याने येथील क्रशरचे परवाने जिल्हाधिकारी कार्यालयातून दिले गेले आहेत. मात्र यावर नियंत्रण ठेवण्याचे काम राजापूर महसुल विभागाचे असले तरी राजापूर महसुल विभागाकडे राजापूर तालुक्यात क्रशर किती व कोणत्या ठिकाणी आहेत याची माहितीच उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
एक हजार ब्रासच्या वरचे क्रशरचे परवाने आयुक्त पातळीवरुन दिले जातात. मात्र यातील कोणतीच माहिती महसुल विभागला माहिती नसल्याचे चित्र समोर आले आहे. महसुल विभागाच्या या अज्ञानाचा फायदा हे क्रशर चालक घेत असुन काही अनधिकृत क्रशर सुरु असल्याचेही उघडपणे बोलले जात आहे. तर परवाने असलेल्या कोणत्या क्रशरला किती ब्रासचा परवाना आहे व तो किती ब्रासचे उत्खनन करत आहे हे महसुल विभागाला कळणार तरी कसे? सध्या क्रशरच्या बाबतीत महसुल विभागाचा कारभार म्हणजे आंधळ दळतय आणि कुत्रं पिठ खातय असाच असल्याचे वास्तव समोर आले आहे.