'मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही'; पोलिसांच्या नोटिशीनंतर मनोज जरांगेंची भूमिका
मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे यांच्याकडून वेळोवेळी उपोषण करण्यात आले आहे. त्यानंतर आताही त्यांनी उपोषण सुरु केले आहे. मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा हा आजचा पाचवा दिवस आहे. याचदरम्यान आता मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस दिली आहे. मात्र, या नोटिशीनंतरही जरांगेंनी आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून येत आहे. ‘मागण्या पूर्ण होईपर्यंत मुंबई सोडणार नाही’, असा इशाराच त्यांनी दिला आहे.
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांचे मुंबईतील आझाद मैदानावर उपोषण सुरू आहे. मात्र, न्यायालयाच्या निर्देशानंतर नियमांचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट होताच मुंबई पोलिसांनी जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आहे. आंदोलनासाठी न्यायालय आणि पोलिसांनी घालून दिलेल्या अटी-शर्तींचे उल्लंघन झाल्यामुळे जरांगे पाटील यांना दिलेल्या परवानग्या रद्द करण्यात आल्या आहेत. आझाद मैदान पोलिसांनी जरांगे यांच्या कोअर कमिटीला नोटीस बजावून मैदान तात्काळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, मुंबई पोलिसांनी नोटीस बजावल्यानंतर मनोज जरांगे म्हणाले की, त्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत ते मुंबई सोडणार नाहीत. जरी त्यांना जीव गमवावा लागला तरी ते मुंबई सोडणार नाही. त्यांनी आंदोलकांना शांतता राखण्याचे आणि हिंसाचार टाळण्याचे आवाहन केले आहे. यापूर्वी, मराठा आरक्षण आंदोलकांनी पोलिसांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देण्याची घोषणा केली होती.
आज सकाळी दिली पोलिसांनी नोटीस
मंगळवारी सकाळी मुंबई पोलिसांनी, मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचे पालन करून, नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल मराठा आरक्षण नेते जरांगे पाटील यांना नोटीस बजावली आणि आंदोलकांना आझाद मैदान रिकामे करण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील यांनी माध्यमांमध्ये केलेल्या विधानांची पोलिसांनी दखल घेतली आहे. असे असले तरीही आंदोलकांनी पोलिसांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याचे म्हटले आहे.
‘ने सुरू ठेवण्यासाठी पोलिसांची परवानगी वाढवण्यासाठी काल रात्री अर्ज करण्यात आला होता. तो मंगळवारी सकाळी पोलिसांनी फेटाळला आणि निदर्शकांना रस्ते रिकामे करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. यावर, निदर्शकांनी पोलिसांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान देणार असल्याचे म्हटले आहे.