'महिलांनी आजार होऊ नये म्हणून योग-प्राणायाम करावे'; योग शिक्षिका पल्लवी आरकिले यांचा सल्ला
टेंभुर्णी : स्त्री म्हणजे आदिशक्ती आहे. अनुलोम-विलोम, कपालभाती प्राणायाम केल्याने पोटाचे विकार कमी होतात. आजार झाल्यावर उपचार घेण्यापेक्षा आजार होऊ नये म्हणून दररोज नियमितपणे योग प्राणायाम करणे गरजेचे आहे. मन व शरीर चांगले राहण्यासाठी योग व प्राणायाम गरजेचा आहे. योग प्राणायामाचे खूप महत्त्व असून, मधुमेहीसाठी अनुलोम, विलोम करावा, वज्रासन केल्याने पोटाचे आजार कमी होतात. योग्य प्राणायामामुळे १५ दिवसात फरक जाणवतो, चेहराही उजळून निघतो. घरी सहज हातपाय हलविले तरी त्याचा लाभ होतो. तसेच सर्वांनी संस्कृती जपली पाहिजे. आई-वडील पती यांचा मान ठेवला पाहिजे, असे मार्गदर्शन योग प्रशिक्षिका पल्लवी आरकिले यांनी केले.
टेंभुर्णी (ता.माढा) येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एकता महिला मंडळाच्या वतीने आयोजित केलेल्या व्याख्यानावेळी त्या बोलत होत्या. यावेळी हास्य योगावर सर्वांना दिलखुलास हसविले. सर्वांनी रोज मोकळ्या मनाने हसले पाहिजे, असा मंत्र दिला. यावेळी एक मुलगी अपत्य असलेल्या अश्विनी कदम, शुभांगी गवळी, रेखा धुमाळ, नंदा बनकर या मातांचा तसेच जय भवानी भजनी मंडळ व श्रीराम भजनी मंडळाच्या प्रभावती यादव, मोहिनी ढगे, सुनीता सोनवणे, सुप्रिया जोशी, उर्मिला लटके, विमल कांबळे, हेमा भास्करे, शोभा भाकरे, शिला गायकवाड, भागीरथी सरवदे आदी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी प्रा. स्वाती पाटील, जयश्री ताबे, रेणुका भणगे, सुनिता पाटील, सोनल नलवडे, सुप्रिया भोसले, कल्पना बारबोले आदी उपस्थित होत्या.
तसेच एकता महिला मंडळाच्या वतीने महिला पोलीस, आरोग्यसेविका, महिला ग्रामपंचायत सदस्या, सरपंच, महिला मंडळाच्या पदाधिकारी, महिला बचत गटाच्या अध्यक्षा, ग्रामपंचायतीच्या महिला सफाई कामगार, ब्युटीपार्लर यासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील महिलांना सन्मानित करण्यात आले आहे.
गोविंद वृध्दाश्रम व पालवी (पंढरपूर) या संस्थेला मंडळाने मदत केली असून, महिलांच्या सामाजिक व आरोग्य विषयक समस्यांवर व्याख्यान आयोजित केल्याचे प्रा. उषा पाटील यांनी प्रास्ताविकात सांगितले. यावेळी एकता महिला मंडळाचा वर्धापनदिन साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी छाया जाधव, स्मिता पालांडे, हवाबी मुलाणी, उल्फत मुलाणी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मंडळाच्या अध्यक्ष प्रा. उषा पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संजीवनी आरबोळे यांनी केले. आभार मनिषा जांभळे यांनी मानले.