लोकप्रतिनिधींशी समन्वय ठेवून काम करा, मान्सूनपूर्व तयारीबाबत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांचे निर्देश
ठाणे महापालिकेच्या कार्यक्षेत्रात मान्सूनपूर्व कामे जलदगतीने सुरू असून ही सर्व कामे येत्या ३० मे पूर्वी पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महापालिकेने निश्चित केले आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी आज झालेल्या बैठकीत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशानुसार प्रशासनाचे लक्ष सर्व कामांवर केंद्रित आहे आणि पावसाळ्यात आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास महापालिका यंत्रणा पूर्णपणे सज्ज आहे.
या बैठकीत आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितले की, सध्या सुरू असलेल्या कामांमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा समावेश करून, त्यांच्याशी समन्वय साधूनच काम पूर्ण करावे. तसेच पावसाळ्याच्या काळात कोणत्याही आपत्कालीन स्थितीत सर्व विभागांनी एकत्रितपणे कार्य करावे आणि एकमेकांवर जबाबदारी न ढकलता नागरिकांच्या हितासाठी तातडीने उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.
असे काय घडले की ‘या’ व्यक्तीने ठाणे पालिकेच्या मुख्यालयात क्रिकेट खेळत नोंदवला निषेध
खासदार नरेश म्हस्के यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत माजी नगरसेवक, महापालिका अधिकारी आणि प्रभाग समित्यांचे सहाय्यक आयुक्त उपस्थित होते. उपायुक्त गजानन गोदेपुरे यांनी मान्सूनपूर्व कामांची माहिती सादर केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनी त्यांच्या भागातील समस्या मांडल्या, ज्यावर संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाहीचे निर्देश देण्यात आले.
गावदेवीसह शहरातील नालेसफाईचे काम युद्धपातळीवर सुरू असून, मध्ये पडलेल्या पावसामुळे डोंगरावरून वाहून आलेल्या गाळामुळे काही ठिकाणी पुन्हा नालेसफाई करावी लागणार आहे. अंतर्गत गटारे आणि रस्त्यांच्या दुतर्फा असलेली गटारे देखील साफ केली जात आहेत. रस्त्यांवरील खड्डे पावसाळ्यात समस्या ठरू नयेत यासाठी विशेष दक्षता घेण्यात आली असून, कोणत्याही रस्त्यावर खड्डा आढळल्यास तो तत्काळ बुजवण्यात येईल.
वृक्षछाटणीबाबत आयुक्तांनी सांगितले की, एप्रिलपासून ही कामे सुरू झाली असून उर्वरित ठिकाणांची छाटणी ३० मेपूर्वी पूर्ण केली जाईल. तसेच छाटणीदरम्यान तयार होणाऱ्या हरित कचऱ्याची तातडीने विल्हेवाट लावण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
वास्तुपूजनाच्या कार्यक्रमासाठी आलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; पाच जणांचा खदानीत बुडून मृत्यू
एमएमआरडीए, मेट्रो, सार्वजनिक बांधकाम विभाग यांसारख्या इतर प्राधिकरणांकडील कामेही ३० मेपूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पावसाळ्यात त्यांच्या अखत्यारितील रस्त्यांवर खड्डे पडल्यास महापालिका स्वतः पुढाकार घेऊन नागरिकांच्या सोयीसाठी ती कामे पार पाडेल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
या बैठकीत नालेसफाई, गटारसफाई, वृक्षछाटणी, रस्ते दुरुस्ती, आरोग्यविषयक उपाययोजना आदी मुद्द्यांवर सखोल चर्चा झाली. उपस्थित लोकप्रतिनिधींनी आयुक्तांच्या सक्रिय भूमिकेचे कौतुक करत त्यांच्या कार्यप्रणालीचे आभार मानले.