असे काय घडले की 'या' व्यक्तीने ठाणे पालिकेच्या मुख्यालयात क्रिकेट खेळत नोंदवला निषेध
एकीकडे मुंबईसह अनेक शहरांमध्ये खेळाच्या मैदानांची संख्या कमी होत आहे, तर दुसरीकडे अस्तित्वात असलेली मैदाने सभा, प्रदर्शन आणि पार्किंगसाठी वापरली जात आहेत. परिणामी, मुलांना मोकळ्या मैदानात खेळण्याची संधी मिळेनाशी झाली आहे. ठाणे शहरातही हीच परिस्थिती दिसून येत आहे. मात्र, यावर लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे यांनी अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. चला याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
IPS Officer Transfer: महाराष्ट्रात बदल्यांच सत्र सुरूच, पुन्हा ६ बड्या IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या
ठाणे शहरातील मैदानांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणावर प्रदर्शने आणि पार्किंगसाठी जागा वापरण्यात येत आहे. यामुळे शहरातील मुलांना खेळण्यासाठी आवश्यक असलेली मोकळी जागा मिळेनाशी झाली आहे. याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते संगम डोंगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी ठाणे महापालिका मुख्यालयाबाहेर अनोख्या पद्धतीने आंदोलन करत निषेध नोंदवला.
डोंगरे यांनी ‘खेळण्यासाठी मैदान हवे, पार्किंग वा प्रदर्शनासाठी नाही’ या मागणीसाठी आपल्या सहकाऱ्यांसह पालिकेच्या प्रवेशद्वारावर क्रिकेटचा डाव मांडला. यावेळी त्यांनी “आम्हीही पैसे देतो, मग आम्हाला मैदान का नाही?” असा सवाल करत मुलांच्या पिगी बँक घेऊन पालिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आयुक्तांची भेट न झाल्याने त्यांनी पिगी बँक फोडून त्यातील पैसे जमिनीवर टाकले आणि खेळ करत आपला निषेध नोंदवला.
Maharashtra Government: ‘आयटीआय जागतिक दर्जाच्या केंद्रात….’; राज्य शासनाने नेमकी कशाला दिली मंजूरी?
ठाण्यातील गावदेवी हे मैदान खेळासाठी आरक्षित असूनही, तिथे वारंवार खासगी संस्थांना प्रदर्शन भरवण्यासाठी देण्यात येत आहे. मागील वर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत हे मैदान तब्बल 174 दिवस व्यापले गेले होते, तर यावर्षी आतापर्यंत 70 दिवस हे मैदान भाडे तत्वावर देण्यात आले आहे. केवळ महसूल मिळवण्यासाठी खेळाच्या मैदानांचा वापर इतर कारणांसाठी केल्याने खेळाडूंना आणि मुलांना फटका बसत आहे.
संगम डोंगरे यांच्या या अभिनव आंदोलनामुळे ठाणेकरांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, पालिकेने याबाबत ठोस भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.