विटा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)यांच्या उपस्थितीत आटपाडी (Atpadi)- भिंगेवाडी (ता. २७) ऑक्टोबरला येणार आहेत. श्रमिक मुक्ती दल व समन्यायी वाटप – पाणी संघर्ष चळवळीच्या वतीने समन्यायी पाणी वाटप प्रकल्पाचा एक भाग म्हणून शेतकऱ्यांना प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती डॉ. भारत पाटणकर यांनी दिली.
आटपाडी – भिंगेवाडी येथील माणगंगा कृषी तंत्रनिकेतन विद्यालयाच्या सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत पाटणकर यांनी माहिती दिली.
डॉ. पाटणकर म्हणाले, १९९३ पासून चळवळीने संघर्षाला सुरुवात केली. अनेक सरकारांविरोधात लढा देत टेंभू योजना दुष्काळी भागात पाणी पोहचले. सर्वांना समान हक्काचे पाणी देण्यासाठी समन्यायीचा पथदर्शक प्रकल्प मंजूर करून तो राबविला जात आहे. त्यात आटपाडी, तासगाव व सांगोला तालुक्यात समावेश आहे. बंंदिस्त पाइपलाइन काम काही भागात झालेले आहे. आता शेतापर्यंत पाणी पोहचविण्याची कामे शिल्लक आहेत. समन्यायी पथदर्शक प्रकल्पातून सर्वांना पाणी मिळणार असले तरी या पाण्याचे योग्य नियोजन गरजेचे आहे. त्या पाण्याबाबत शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे. माती, पाणी, पीकपद्धती शेतीची प्राथमिक उत्पादकता वाढविणे, यासाठी माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत भिंगेवाडी कृषी तंत्रनिकेतन विद्यालयात दहा वाजता कार्यशाळा होणार आहे.
निमंत्रक आनंदराव पाटील म्हणाले, कार्यशाळेसाठी शरद पवार, जयंत पाटील, डॉ. भारत पाटणकर यांच्या सह शेतीतज्ञ या कार्यशाळेसाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. यावेळी सुशांत देवकर, सादिक खाटीक, राजेंद्र सावंत, संतोष गोटल, विजय पुजारी, प्रा. संभाजी पाटील, राजेंद्र खरात, शंकर गळवे, अमोल माने, सुभाष विभुते, शंकर गिड्डे उपस्थित होते.