मुंबई : आपल्यापैकी अनेकांनी ‘3 इडिएट्स’ हा चित्रपट पाहिला असेल. यात अभिनेता आमिर खानने रँचोची भूमिका साकारली होती. याच रँचोने व्हिडिओ कॉलवरून महिलेची प्रसूती केली होती. त्यानंतर मुंबईत रिअल लाईफमधील रँचो अनुभवायला मिळाला. मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर रात्री एकच्या सुमारास एका महिलेची प्रसूती करण्यात आली तेही व्हिडिओ कॉलवरून डॉक्टरच्या सल्ल्याने. सध्या याचीच चर्चा सुरु झाली आहे.
रेल्वेने प्रवास करत असताना या महिलेला रात्री उशिरा एकच्या सुमारास प्रसूती कळा सुरु झाल्या. तेव्हा तरुणाने प्रसंगावधान दाखवत ट्रेनची साखळी ओढून ट्रेन थांबवली आणि डॉक्टरच्या व्हिडिओ कॉलद्वारे मार्गदर्शन करून प्रसूती केली. सध्या याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. विकास बेगडे असे या तरुणाचे नाव आहे. विकासने अत्यंत धाडसाने परिस्थिती सामोरे जात महिलेसह तिच्या बाळाचाही जीव वाचवला. त्यामुळे आता त्याचं कौतुक करण्यात आलं.
सीआरपीएफ आणि तेथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी या तरुणाचं कौतुक केलं आहे. या व्यक्तीच्या मदतीने महिलेने गोंडस बाळाला जन्म दिला. मला डिलिव्हरी करताना मोठं दडपण होतं, पण डॉक्टरांनी दिलेल्या माहितीप्रमाणेच केलं. प्रसूती झाल्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले, असे विकासने सांगितले.
धावत्या ट्रेनमध्ये झाली प्रसूती
राम मंदिर स्टेशनजवळ धावत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसूती झाली आहे. यावेळी डॉक्टर तेथे उपस्थित नव्हते. पण डॉक्टरांनी दिलेली माहिती त्याने तंतोतंत पाळली आणि महिलेची प्रसूती केली आहे. बाळाचे डोके अर्धे बाहेर आले होते. एम्ब्युलन्स उशिरा येत असल्याने प्रत्यक्षदर्शींनी डॉक्टरांना फोन केला. एका महिला डॉक्टरने व्हिडिओ कॉलवर मार्गदर्शन केले आणि विकास यांनी ही गोष्ट अगदी तंतोतंत तशी पाळली.
रेल्वे थांबवली स्टेशनवर
ही घटना 15 ऑक्टोबरला रात्री सुमारे 1 वाजता मुंबईतील राम मंदिर रेल्वे स्टेशनवर घडली. ट्रेन चालू असताना महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या. त्यानंतर तरुणाने प्रसंगावधान राखत स्टेशनवर ट्रेन थांबवली.