
तासगाव : स्मार्ट फोनच्या जगतात समाजाच्या सर्वच स्तरात मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. मग मटका आणि जुगार क्षेत्र तरी स्मार्ट होण्यापासून का मागे राहतील. सतत पडणारी पोलिसांची धाड आणि सामाजिक दबाव या कारणामुळे मटक्यांचे अड्डे चालवणे मुश्किल झाले असतानाच मटका किंगकडून मटक्यासाठी स्मार्ट फोनचा आधार घेतला जातो आहे याच स्मार्ट मटक्याने तासगाव तालुक्यातील तरुणाईला अक्षरशः पोखरून काढले आहे.
स्मार्ट फोनच्या जगतात काहीही घडू शकत आणि स्मार्ट फोनच्या माध्यमातून समाजाच्या दैनंदिन उठक बैठकीत हि बदल होऊ शकतो हे अलीकडच्या काळात दिसून येते आहे. स्मार्ट फोनच्या अति वापराने तरुणाईत अनेक आजार बळावले आहेत. ऑनलाईन मटका, जुगार आणि लॉटरी त्यांच्या माध्यमातून अनेकांना श्रीमंत आणि गरीब होताना आपण पहिले आहे. परंतु स्मार्ट फोनच्या माध्यमातून अनेक अॅप्सचा व ऑनलाईन पोर्टलचा सुळसुळाट सुटला असल्याचे चित्र बघायला मिळते आहे. स्मार्ट फोनवर अॅप्स डाउनलोड करून त्याच्यावर मटका जुगार खेळला जातो आणि लाखो रुपयांना चुना लावून लोकांना कंगाल करण्याचा कार्यक्रम रोजरोजपणे राबवला जातो. या अशा अॅप्सवर पोलीस कारवाईचा जराही वचक नाही यामुळे अशी अॅप्स लोकांना लाखो रुपयांचा गंडा घालण्यात यशस्वी होत आहेत.
लॉटरी सेंटरवर पोलिसांचा छापा
अशा ऑनलाईन लॉटरी सेंटरवर पोलिसांनी छापा टाकला आणि त्या ठिकाणी असलेले कॉम्प्युटर आणि साहित्य पोलिसांनी जप्त केले. दरम्यान ग्रामीण भागात तरुण बेरोजगारीने ग्रासलेला असतानाच अशा घरबसल्या पैसा कमावण्याच्या अमिषाला तरुण वर्ग सहजच बळी पडत आहेत. त्यामुळे अशा लोकांच्या काळ्या धंद्याला लगेच चालना मिळत असल्याचे चित्र पाहण्यास मिळते आहे.
तासगाव पूर्व भागात अवैध धंदे
तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात द्राक्षबाग कामगारांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. नव्याने वाढलेल्या लोकवस्तीत तरुण मुलांचे रोजगारासाठी येण्याचे प्रमाण अधिक असल्याने तरुणांना मोहित करण्यासाठी या भागात अशा ऑनलाइन मटक्या जुगाराचे ऑनलाईन धंदे भरास आले आहेत. त्या व्यवसायांच्या वाढीमुळे रोजगारासाठी आलेल्या तरुणांचा कष्टाचा पैसा अशा ऑनलाइन जुगार मटक्यात वाया चालला असल्याने तासगाव पोलीस प्रशासनाकडून कार्यवाहीची आवश्यकता असल्याचे बोलले जाते आहे.