पुणे : स्वारगेट पोलिसांनी दुहेरी कारवाई करत जबरदस्तीने मोबाईल हिसकावणाऱ्या चोरट्यांसह दुचाकी चोरणाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. यामध्ये पोलिसांनी तिघांना अटक केली असून, यात एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्यांच्याकडून एकूण चार गुन्ह्यांची उकल झाली आहे.
दुचाकी चोरणाऱ्या राजेंद्र परमेश्वर कदम (वय २४) याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून दोन दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तर, एका अल्पवयीन मुलाला पकडून त्याच्याकडून पोलिसांनी एक दुचाकी जप्त केली आहे. जबरदस्तीने मोबाईल हिसकावणाऱ्या साद शेरअली शेख (वय २२) व उदय सुनिल जाधव (वय २२, रा. सोमवार पेठ) यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई परिमंडळ दोनच्या उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक दिलीप फुलपगारे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) गीता बागवडे, उपनिरीक्षक अशोक येवले, अनिल शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, संदीप घुले व त्यांच्या पथकाने केली आहे.
सीसीटीव्हीवरून धागेदोरे
स्वारगेट परिसरात, बस स्थानक व इतर भागात या घटना सातत्याने घडत होत्या. पोलीस पथकाने सीसीटीव्ही तपासले. तसेच, चोरट्यांचा माग काढण्यास सुरवात केली होती. तेव्हा पोलिसांना राजेंद्र कदम याच्याबाबत माहिती मिळाली. त्याला पकडून चौकशी केली असता त्याच्याकडून दुचाकी चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले. त्यासोबतच एका अल्पवयीन मुलाला पकडले असता त्याच्याकडून एक दुचाकी जप्त केली.
त्याचवेळी दुसऱ्या माहितीत साद शेख व उदय जाधव यांना पकडले. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबूली दिली. त्यांच्याकडून एक मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त केली आहे. पुढील तपास स्वारगेट पोलीस करत आहेत.