
(फोटो सौजन्य -इन्स्टाग्राम)
2025च्या अखेरीस टॉलिवूड सिनेसृष्टीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे.ज्येष्ठ कला दिग्दर्शक के. शेखर यांचे निधन झाले आहे. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला आहे. के. शेखर यांचे निधन तिरूअनंतपुरम येथील त्यांच्या घरी झालं आहे. के. शेखर यांच्या निधनानंतर मल्याळम सिनेसृष्टीत शोककळा पसरली आहे. मल्याळम सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कला दिग्दर्शक के. शेखर हे आपल्या अफाट कल्पनाशक्ती आणि स्मार्ट सेट डिझाइनसाठी ओळखले जात होते. आतापर्यंत त्यांनी अनेक गाजलेल्या मल्याळम चित्रपटांसाठी खास आणि नावीन्यपूर्ण सेट्सची रचना केली होती. त्यांच्या कलाकृतींमुळे चित्रपटांना वेगळी ओळख मिळाली असून, त्यांच्या जाण्याने सिनेसृष्टीत मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
के. शेखर यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचे काम म्हणजे भारतातील पहिली 3D फिल्म ‘माय डियर कुट्टीचाथन’ (1984) साठी त्यांनी तयार केलेले सेट्स. या चित्रपटातील फिरणाऱ्या खोलीचे प्रसिद्ध दृश्य ही त्यांची कल्पना होती. या सेटमध्ये कॅमेरा जागेवर ठेवून संपूर्ण खोली फिरवली जात असे, त्यामुळे कलाकार हवेत तरंगत असल्यासारखे दिसत. 1980च्या दशकात हे तंत्र खूपच नवीन आणि वेगळे मानले जात होते.
के. शेखर यांनी यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात 1980 साली केली.के. शेखर हे 1980 साली मल्याळम चित्रपटसृष्टीत आले. त्यांचा पहिला चित्रपट जिजो पुन्नूस दिग्दर्शित ‘पदयोत्तम’ होता, ज्यात त्यांनी कॉस्ट्यूम आणि पब्लिसिटी डिझायनर म्हणून काम केले. नंतर त्यांनी ‘नोक्केथा दूरथ कन्नूम नट्टू’ आणि ‘ओन्नू मुथल पूज्यम वारे’सारख्या चित्रपटांसाठी कला दिग्दर्शन केले.
1980च्या दशकात त्यांनी तयार केलेल्या फिरणाऱ्या खोलीच्या दृश्यासाठी वापरलेल्या तंत्राला भारतीय चित्रपटसृष्टीत अभूतपूर्व मानले जात असे. ही कल्पना स्टॅनी क्युब्रिकच्या ‘2001: अ स्पेस ओडिसी’ चित्रपटातून आली होती, पण के. शेखर यांनी 26 वर्षांपूर्वी कोणत्याही सीजीशिवाय हे यशस्वीरीत्या केले. आजही अनेक चित्रपटांमध्ये या तंत्राचा उपयोग केला जातो.