गुरुवारी ११ ऑगस्ट रोजी सर्वत्र रक्षाबंधन (Rakshabandhan) आणि नारळीपोर्णिमेचा (Naralipornima) सण साजरा केला जात आहे. कोरोना महामारीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर यंदा हा सण साजरा करण्यासाठी लोकांमध्ये भलताच उत्साह दिसून येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने राजकारणी, अभिनेते यांसह सर्वच मंडळी यादिवशी आपल्या कुटुंबा समवेत राखी पौर्णिमा साजरी करीत आहेत. अशातच धर्मवीर चित्रपटातून आपल्या दमदार अभिनयाची छाप पडणाऱ्या अभिनेता प्रसाद ओक ने रक्षाबंधनाची खास आठवण सांगितली आहे.
खरंतर अभिनेता प्रसाद ओक (Prasad Oak) याला बहीण नाही. त्यामुळे प्रसादने रक्षाबंधनाचा सण कधीही साजरा केला नव्हता. परंतु धर्मवीर चित्रपटाच्या निमित्ताने आनंद दिघे यांची भूमिका साकारणाऱ्या प्रसाद ओक ला रक्षाबंधनाचा सण साजरा करता आला. रक्षाबंधनाचा सिन चित्रित करीत असताना प्रसादला एक दोन नाही तर तब्बल शंभर बहिणींनी राख्या बांधल्या. याविषयी बोलताना अभिनेता प्रसाद ओक ने म्हंटले, माझ्यासाठी ते रक्षाबंधन खूप विशेष होत. आजपर्यंत कधीही न घेतलेला अनुभव मी घेत होतो. या दृश्याच्या चित्रीकरणाची तयारी सकाळपासूनच सुरु होती. माझ्या हातात भरपूर राख्या बांधल्या होत्या. दोन्ही हाताला भरभरून राख्या घेऊन मी इकडे तिकडे हिंडत होतो.
दिग्दर्शक प्रवीण तरडे यांना धर्मवीर (Dahrmveer)आनंद दिघे असताना जसा रक्षाबंधनाचा सण साजरा होत होता तसेच रक्षाबंधनाचा सण चित्रीकरण करून चित्रपटात दाखवायचा होता. या दरम्यान १०० पेक्षा जास्त महिलांनी मला ओवाळल असेल आणि त्यांच्या कडून मी राख्या बांधून घेतल्या होत्या. रक्षाबंधनाचा सिन जेव्हा चित्रपटाच्या मोठ्या पडद्यावर पाहिला तेव्हा अनेक महिलांनी मला “अगदी असाच असायचा रक्षाबंधनाचा दिवस”, आम्ही रांगेत थांबून दिघे साहेबांना ओवाळलं आहे अश्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.