(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
दरवर्षीप्रमाणेच अभिनेत्री अश्विनी महांगडेने यंदाही नवरात्री सणाच्या निमित्ताने हटके आणि अर्थपूर्ण फोटोशूटद्वारे चाहत्यांचे लक्ष वेधले आहे. या वर्षी तिने खास संकल्पनेतून मराठी चित्रपटसृष्टीतील दिवंगत आणि दिग्गज अभिनेत्रींचा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. अभिनेत्री रोज नवीन नवीन फोटो पोस्ट करताना दिसत आहे.लता मंगेशकर, सिंधुताई सपकाळ अश्या अनेक महान महिलांच्या लूकमध्ये देवीचं दर्शन. प्रत्येक दिवशी या विशेष रूपाबद्दल माहिती देऊन ती समाजात सकारात्मकता आणि जागरूकता निर्माण करत आहे.
आज, नवरात्रीतील राखाडी रंगाच्या निमित्ताने अश्विनीने साकारला आहे सुधा मूर्ती यांचा प्रभावशाली आणि साधेपणाने भरलेला लूक. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे की,“सुधा मूर्ती – लेखिका, समाजसेविका आणि इन्फोसिस फाउंडेशनच्या अध्यक्षा, एक अशी स्त्री जी ज्ञान, माणुसकी आणि कार्यशीलतेचं मूर्तिमंत उदाहरण आहे.”सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५०, शिगगाव (कर्नाटक) येथे झाला. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण करून त्यांनी सामाजिक क्षेत्रात पाय ठेवला आणि आजवर हजारो लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला. त्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये साहित्य लेखन केलं आहे. त्यांच्या कार्यासाठी त्यांना पद्मश्रीसह अनेक राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.” असं कॅप्शन देत तिने ही पोस्ट केली आहे.
तिच्या या प्रयत्नांतर्गत अश्विनीने शुक्रवारी नवरात्रीतील हिरवा रंगाच्या निमित्ताने मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय आणि आयकॉनिक अभिनेत्री रंजना यांचा लूक साकारला होता. पारंपरिक मराठमोळ्या साडी आणि त्या काळातल्या खास हेअरस्टाईलसह तयार केलेल्या या लूकला चाहत्यांनी भरभरून प्रेम दिले होते. सोशल मीडियावर अश्विनीचा हा फोटोशूट जोरदार व्हायरल होत आहे. नवरात्रीचे ९ दिवस अश्या वेगवेगळ्या पोस्ट ती चाहत्यांसाठी शेअर करणार आहे. ज्याला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून चाहत्यांची पसंती मिळताना दिसत आहे.