'ऑपरेशन सिंदूर' रुपेरी पडद्यावर दिसणार, चित्रपटाची घोषणा होताच नेटकरी भडकले; म्हणाले- "लाज वाटत नाही?"
जम्मू- काश्मिरच्या पहलगाममध्ये झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात २६ भारतीयांनी आपला जीव गमावला. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ७ मेच्या मध्यरात्री पाकिस्तान आणि पाक व्याप्त काश्मिरामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’ राबवले. या ऑपरेशनमध्ये भारतीय लष्कराने ९ दहशतवादी तळ नेस्तनाभूत केली. या हल्ल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या हल्ल्याचा थरार पुन्हा एकदा प्रेक्षकांना आता रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. निर्मात्यांकडून चित्रपटाची घोषणा होताच नेटकऱ्यांनी निर्मात्यांना चांगलंच ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे.
२०१६ साली झालेल्या उरी हल्ल्यावर २०१९ साली ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’ नावाचा चित्रपट रिलीज झाला होता. त्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई केलेली आहे. चित्रपटातले डायलॉग्स आणि गाणे आजही चाहत्यांच्या ओठांवर रुळलेले आहेत. ‘उरी- द सर्जिकल स्ट्राईक’नंतर आता ‘ऑपरेशन सिंदूर’ नावाचा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. परंतू भारत- पाकिस्तानामध्ये सध्या सुरु असलेल्या या तणावावर चित्रपट बनवण्यासाठी भारतीय निर्मात्यांमध्ये चढाओढ सुरु आहे. आता अशातच ‘ऑपरेशन सिंदूर’ची घोषणा निकी विकी भगनानी आणि द कॉन्टेंट इंजिनिअरने केली आहे.
‘ऑपरेशन सिंदूर’च्या नावाने एक- दोन नव्हे तर अनेक निर्मात्यांनी आणि दिग्दर्शकांनी चित्रपट रजिस्टर केला आहे. पण, आता हे टायटल आता कोणाकोणाला मिळणार हे अद्याप तरी गुलदस्त्यात आहे. दरम्यान, भारत- पाकिस्तान यांच्यात सुरू असलेल्या युद्धादरम्यान दिग्दर्शक उत्तम माहेश्वरी आणि नितीन कुमार गुप्ता यांनी या विषयावर बनवत असलेल्या सिनेमाची घोषणा केली आहे. या चित्रपटाच्या प्रॉडक्शनची जबाबदारी निकी विकी भगनानी फिल्म्स आणि द कॉन्टेंट इंजिनिअरकडे देण्यात आली आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चे रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरमध्ये, युद्धजन्य परिस्थितीत भारतीय जवानांपैकी एक जवान हातात बंदूक घेऊन दिसत आहे. पोस्टरवर ‘ऑपरेशन सिंदूर’च्या आधी भारत माता की जय असे लिहिण्यात आलंय.
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मेकअप आर्टिस्टचं निधन, वयाच्या ६१ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
‘ऑपरेशन सिंदूर’चे पोस्टर पाहून नेटकरी निर्मात्यांवर टीका करत आहेत. एका सोशल मीडिया युजरने लिहिले की, ‘स्वतः आपल्या देशाची थट्टा करू नका.’ दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘लाज वाटली पाहिजे तुम्हाला आणि संपूर्ण बॉलिवूडला प्रत्येक गोष्टीत पैसे छापण्याचे माध्यम बनवले आहे.’, ‘ऑपरेशन सिंदूर अद्याप संपले नाही आणि तुम्ही सगळे या चिंताजनक परिस्थितीचा फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहात. प्रार्थना करतो की तुमचे कर्म तुम्हाला चांगलाच धडा शिकवेल.’, ‘युद्ध अजून बाकी आहे मित्रा.’ अशी अनेक कमेंट्स करत नेटकऱ्यांनी निर्मात्यांना चांगलेच फटकारले आहे.