Famous Makeup Artist Vikram Gaikwad Passes Away In Mumbai
मराठी इंडस्ट्रीसह बॉलिवूड इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. मराठीसह अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये आपल्या मेकअप कौशल्याने अनेक पात्र जिवंत करणाऱ्या मेकअप आर्टिस्टचं निधन झालं आहे. सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांचं निधन झालं आहे. ते ६१ वर्षांचे होते. ते गेल्या अनेक दिवसांपासून आजारी होते. त्यांना कोरोना काळात अर्धांगवायूचा झटका आला होता. तेव्हापासून ते आजारीच आहेत. मात्र गेल्या ८ दिवसांपासून अचानक त्यांची तब्येत खालावल्याने त्यांना मुंबईतल्या एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यानच त्यांची प्राणज्योत मालवली.
‘जगाच्या नकाशावरुन त्यांना मिटवून टाका…’ भारत- पाकिस्तान युद्धावर अभिनेत्री कंगना रणौतची प्रतिक्रिया
मेकअप आर्टिस्ट विक्रम गायकवाड यांच्या पश्चात त्यांची पत्नी ज्योत्सना आणि मुलही तन्वी आहे. त्यांना अर्धांगवायूचा झटका आल्यापासून ते आजारीच होते. त्यांच्यावर मुंबईतील पवईमधील सुप्रसिद्ध हिरानंदानी रुग्णलयात उपचार सुरु होते. उपचाराअंतीच त्यांची प्राणज्योत मालवली. विक्रम गायकवाड यांचं निधन आज (१० मे शनिवार) सकाळी ८ च्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. आज सायंकाळी मेकअप आर्टिस्टवर दादरच्या शिवाजी पार्कमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या मेकअप आर्टिस्टच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विक्रम यांच्या निधनामुळे संपूर्ण फिल्म इंडस्ट्रीमध्ये शोकाचं वातावरण आहे. अनेक नामवंत कलाकार, निर्माते, दिग्दर्शकांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली अर्पण केली आहे.
‘काशीनाथ घाणेकर’, ‘बालगंधर्व’, ‘ठग्ज ऑफ हिंदुस्तान’, ‘लोकमान्य: एक युगपुरुष’, ‘शहीद भगतसिंग’, ‘पानिपत’, ‘दंगल’, ‘संजू’, ‘भाग मिल्खा भाग’, ‘झांसी की रानी’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’, ‘सुपर ३०’, ‘झुबैदा’, ‘ओमकारा’, ‘मकबूल’, ‘आदिपुरुष’ आणि ‘पोन्नियन सेल्वन’ सारख्या अनेक शेकडो चित्रपटांमध्ये मेकअप डिझायनर आणि रंगभूषाकार म्हणून विक्रम गायकवाड यांनी अतुलनीय कामगिरी बजावली. त्यांच्या कुशल रंगभूषेमुळे अनेक ऐतिहासिक आणि चरित्रप्रधान भूमिका अधिक प्रभावी ठरल्या. त्यांच्या अतुलनीय कार्याची दखल घेत ७ वेळा राष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आले होते. २०१३ साली एका बंगाली चित्रपटासाठी विक्रम यांना विशेष सन्मान मिळाला होता. फक्त बॉलिवूडच नव्हे, तर मराठी सिनेसृष्टीतील ‘छत्रपती शिवाजी महाराज’, ‘पावनखिंड’, ‘फत्तेशिकस्त’ आणि ‘शेर शिवराज’सारख्या ऐतिहासिक चित्रपटांत आणि मालिकांमध्ये त्यांनी इतिहास जिवंत केला होता.