मनसे नेते अमेय खोपकरांची पॅडी कांबळेसाठी खास पोस्ट
बिग बॉसच्या घरात नुकताच ‘सत्याचा पंचनामा’ हा टास्क पार पडला. या टास्क दरम्यान, जान्हवी किल्लेकर आणि पॅडी कांबळेमध्ये जोरदार वाद झाला. टास्क दरम्यान, जान्हवीने पॅडीचा अभिनयावरून अपमान केला आहे.
जान्हवी म्हणाली, “सगळे घाणेरडे आहेत. यांच्यात समोर येऊन बोलण्याची हिंमत नाहीये. पॅडी दादांच्या तर काहीतरी अंगातच घुसलंय. बाहेर ओव्हर अॅक्टिंग करून दमले, आता ती ओव्हर अॅक्टिंग घरात दाखवतायत.” जान्हवीने पंढरीनाथ कांबळेचा केलेला अपमान ऐकून अनेकांनी तिला ट्रोल केले आहे. इंडस्ट्रीतील अनेक प्रसिद्ध अभिनेत्यांनी जान्हवीवर चहूबाजूने टीकेचे बाण सोडले आहे. आता अशातच मनसे नेते अमेय खोपकर यांनीही अभिनेत्याच्या समर्थनार्थ ट्वीट केले आहे.
शेअर केलेल्या ट्वीटमध्ये अमेय खोपकर यांनी पॅडीचा फोटो पोस्ट करत लिहिले की, “पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संघर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना. आताही बिग बॉसमध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एन्जॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही आहोत तुला फायनलपर्यंत घेऊन जायला.”
पॅडी, तुझा प्रवास आणि तुझा संधर्ष आम्ही सर्वांनी खूप जवळून पाहिलाय. नेहमीच खळखळून हसवलंस आम्हाला सगळ्यांना… आताही बिग बॉस मध्ये शांत डोकं ठेवून तू जी धमाल करतोयस ती आम्ही मस्त एंजॉय करतोय. जान्हवीसारख्या चिल्लर सदस्यांच्या कलकलाटाकडे लक्ष द्यायची गरजच नाही. तू बिनधास्त लढ, आम्ही… pic.twitter.com/n8246obfgJ
— Ameya Khopkar (@MNSAmeyaKhopkar) August 21, 2024
दरम्यान, टास्कवेळी जान्हवीने पॅडीच्या करिअरविषयी भाष्य केल्यानंतर आर्याने तिला जाब विचारला होता. कोणाच्या करिअरविषयी तिला बोलण्याचा हक्क नाही, असं म्हणत ती जान्हवीवर भडकली. त्यावेळी तिने आर्याला “मी फालतू माणसांना रिप्लाय देत नाही.” असं उत्तर दिलं होतं. पॅडीने मात्र जान्हवीकडे दूर्लक्ष करत आर्यालाही तिच्याशी भांडण करण्यापासून थांबवले. यावरुन पॅडी यांच्या संयमाचे कौतुक होत असून, जान्हवीच्या वागणुकीचा निषेध मराठी फिल्म इंडस्ट्री करत आहे.