
फोटो सौजन्य - Social Media
बॉलिवूडच्या रोमँटिक थ्रिलर चित्रपटांमध्ये विशेष स्थान मिळवलेल्या फनाला आज तब्बल २० वर्षे पूर्ण झाली आहेत. २००६ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रेक्षकांच्या मनावर एक वेगळीच छाप सोडली होती. आमिर खानचा रोमँटिक अंदाज, काजोलसोबतची त्याची शानदार केमिस्ट्री आणि भावनिक कथानक यामुळे फना प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिला. विशेष म्हणजे, झूनीच्या भूमिकेसाठी काजोलचं नाव स्वतः आमिर खान यांनी सुचवलं होतं, ही गोष्ट अनेक चाहत्यांना आजही माहिती नाही.
फना हा आमिर खान आणि काजोलचा एकत्र पहिलाच रोमँटिक चित्रपट होता. झूनीच्या भूमिकेत काजोलने आपल्या अभिनयातून एक वेगळी भावनिक ताकद दाखवली होती. तिच्या व्यक्तिरेखेतली निरागसता, प्रेम आणि वेदना तिने अतिशय प्रभावीपणे साकारली. दुसरीकडे, आमिर खानने रेहानच्या भूमिकेत आकर्षक आणि गूढ अशा व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय दिला होता. दोघांची ऑनस्क्रीन जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली आणि आजही ती बॉलिवूडमधील लक्षात राहणाऱ्या जोड्यांपैकी एक मानली जाते.
या चित्रपटाचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे, फनामधून काजोलने जवळपास पाच वर्षांनंतर मुख्य अभिनेत्री म्हणून मोठं पुनरागमन केलं होतं. त्यामुळे या चित्रपटाकडे प्रेक्षकांचं विशेष लक्ष होतं. काजोलच्या अभिनयाचंही त्या काळात मोठ्या प्रमाणावर कौतुक झालं होतं. दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी फनाच्या माध्यमातून प्रेम, भावना आणि थरार यांचा सुंदर मिलाफ प्रेक्षकांसमोर मांडला होता. चित्रपटात झूनी नावाच्या एका अंध काश्मिरी मुलीची कथा दाखवण्यात आली होती, जिला तिचा टूर गाईड रेहानवर प्रेम होतं. मात्र, रेहानच्या आयुष्यात एक मोठं आणि धोकादायक रहस्य दडलेलं असतं, याची झूनीला कल्पनाही नसते. कथानक जसजसं पुढे सरकतं, तसतसा चित्रपट अधिक रंजक आणि भावनिक होत जातो.
प्रदर्शनानंतर फनाला बॉक्स ऑफिसवरही मोठं यश मिळालं होतं. हा त्या वर्षातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या हिंदी चित्रपटांपैकी एक ठरला होता. याशिवाय चित्रपटातील गाणीही प्रचंड लोकप्रिय झाली होती. चांद सिफारिश, मेरे हाथ में, देश रंगीला आणि चंदा चमके यांसारखी गाणी आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहेत. २० वर्षांनंतरही फनाची लोकप्रियता कमी झालेली नाही. दमदार अभिनय, सुंदर संगीत आणि भावनिक कथानकामुळे हा चित्रपट आजही हिंदी सिनेमातील सर्वोत्कृष्ट रोमँटिक थ्रिलरपैकी एक मानला जातो.