(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
स्टार प्लसच्या ‘अनुपमा’ या लोकप्रिय मालिकेने कथेची दमदार मांडणी, भावनिक संबंध आणि कौटुंबिक नात्यांचे अस्सल चित्रण करून प्रेक्षकांना खिळवून ठेवले आहे. गेल्या काही वर्षांपासून या मालिकेने नाट्यमय प्रसंग आणि हृदयस्पर्शी क्षण यांची सांगड घालून प्रेक्षकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या आहेत आणि प्रत्येक भाग टीव्हीच्या पडद्यावर काही तरी नवीन आणि अर्थपूर्ण घेऊन येईल, याची दक्षता या मालिकेने घेतली आहे.
अलीकडेच आलेल्या प्रोमोमध्ये कथानकाने एक रोमांचक वळण घेतल्याचे दिसत आहे. अखेरीस सर्वांच्या प्रतीक्षेचा अंत करत डान्स कॉम्पिटिशन आता येऊन ठेपली आहे. यावेळी हा काही साधासुधा परफॉर्मन्स नाही, ही आई विरुद्ध मुलीची लढत आहे. अनुपमा आपली मुलगी राही हिच्याविरुद्ध कॉम्पिटिशनमध्ये लढताना दिसणार आहे. दोघींना आपल्या डान्स रानी आणि अनुज डान्स अकॅडेमी टीम्सकडून मजबूत पाठिंबा मिळणार आहे. दोन्ही टीम कसून परिश्रम घातली जात आहे. ही लढत केवळ उत्कृष्ट डान्स परफॉर्मन्स नाही, तर सोबत जबरदस्त नाट्य आणि भावनांचा कल्लोळ घेऊन येणार आहे. दोन्ही टीम जिंकण्यासाठी लढणार आहेत आणि त्यामुळे प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
या मालिकेत राहीची भूमिका करणारी अद्रिजा रॉय या आगामी कथानकाबाबत उत्साहाने सांगते, “राही म्हणून हा एक खूप खास आणि भावनिक क्षण आहे. कारण ज्या दिवसाची आपण इतकी वाट पाहिली, तो दिवस अखेरीस आला आहे. एकाच मंचावर येऊन प्रत्यक्ष माझी आई अनुपमा हिच्यासोबत डान्स स्पर्धेत उतरण्याची मी कधी कल्पनाही केली नव्हती. आम्ही दोघींनी खूप मेहनत घेतली आहे, कसून तयारी केली आहे. ऊर्जा, पॅशन आणि भावना यांनी कळस गाठला आहे. त्यामुळे ही केवळ एक स्पर्धा नाही, तर आमच्या जीवनातील टर्निंग पॉइंट आहे. माझ्यासाठी, जिंकण्या किंवा हारण्यापेक्षा संपूर्णपणे झोकून देऊन डान्स करण्याची आणि आपल्या आईसमोर स्वतःला सिद्ध करण्याची ही एक संधी आहे.”
‘ओरडू नका…’ उच्च न्यायालयात एकमेकांना भिडले करिश्मा आणि प्रियाचे वकील, इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल
स्पर्धेतील चुरस शिगेला पोहोचली आहे आणि या स्पर्धेत कोण जिंकणार- टीम डान्स रानी की अनुज डान्स अकॅडेमी, याची उत्सुकता वाढली आहे. ‘अनुपमा’चा हा हाय-व्होल्टेज एपिसोड पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. या स्पर्धेत आता नक्की काय घडणार आणि कोण जिंकणार हे प्रेक्षकांना येणाऱ्या भागात समजणार आहे.