(फोटो सौजन्य इन्स्टाग्राम)
सध्या संपूर्ण देशभरात दिवाळीचा उत्साह ओसंडून वाहतो आहे. नरकचतुर्दशीच्या दिवशी पहाटे लवकर उठून सुवासिक तेल आणि उटणं लावून अभ्यंगस्नान करण्याची पारंपरिक प्रथा आजही अनेक घरांमध्ये आवर्जून पाळली जाते. मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटींनीदेखील हा सण आपल्या कुटुंबीयांसोबत साजरा केला असून त्यांच्या उत्सवाची झलक सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
बॉलीवूड अभिनेत्री जिनिलिया देशमुख दरवर्षी देशमुख परिवाराच्या दिवाळी उत्सवाचे खास क्षण आपल्या चाहत्यांसोबत शेअर करत असते. मराठी सण साजरे करण्याची तिची पद्धत नेहमीच चर्चेचा विषय ठरते. यंदाही दिवाळीच्या पहिल्याच दिवशी जिनिलियाने तिच्या दोन्ही मुलांना तेल आणि उटणं लावून अभ्यंगस्नान घातलं.
जिनिलिया देशमुख सध्या सोशल मीडियावर तिच्या दिवाळी सेलिब्रेशनमुळे चर्चेत आली आहे. तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये रियान आणि राहीलला उटणं लावून अभ्यंगस्नान घालत असल्याचं गोड दृश्य पाहायला मिळत आहे. पारंपरिक पद्धतीने साजरा केलेला हा सण चाहत्यांच्या मनात विशेष ठसा उमटवतो आहे.
या व्हिडीओला अभिनेत्रीने तिच्या पती रितेश देशमुखच्या ‘वेड’ चित्रपटातील “सुख कळले…” हे भावनिक गाणं जोडले आहे, ज्यामुळे व्हिडीओला आणखी एक गोड आणि प्रेमळ स्पर्श मिळतो. हा खास क्षण शेअर करत जिनिलियाने लिहिले,“R n R (रियान आणि राहील) हा हक्क कायमस्वरूपी माझा असेल.”
या पोस्टवर चाहत्यांकडून आणि सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दोन्ही मुलांना पारंपरिक पद्धतीने अभ्यंगस्नान घातल्यानंतर जिनिलियाने रियान आणि राहीलचं औक्षण केल्याचं या गोड व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे. दिवाळीचा सण, पारंपरिक रितीरिवाज आणि आई-मुलांमधील प्रेमळ नातं यांचा सुंदर संगम या व्हिडीओत स्पष्टपणे दिसतो.
जिनिलियाने शेअर केलेल्या या व्हिडीओवर नेटकरी अक्षरशः कौतुकाचा वर्षाव करत आहेत.