(फोटो सौजन्य- Social Media)
रणबीर कपूर, आलिया भट्ट आणि विकी कौशल हे स्टार एकत्र स्क्रीन शेअर करणार असून, हे पाहण्यासाठी चाहते आतुर आहेत. संजय लीला भन्साळी दिग्दर्शित ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात हे तिघे एकत्र काम करताना दिसणार आहेत. या चित्रपटाची घोषणा आधीच करण्यात आली होती आणि आता या वर्षीच शूटिंग सुरू होणार असल्याच्या बातम्या येत आहेत. पिंकविलाच्या वृत्तानुसार, रणबीर कपूर आणि विकी कौशल ऑक्टोबरमध्ये शूटिंग सुरू करतील आणि आलिया डिसेंबरमध्ये त्यांच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
आलिया सध्या अल्फा चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त
मिळालेल्या माहितीनुसार, रणबीर कपूरसोबत ‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटाची शूटिंग ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणार आहे. यानंतर विकी कौशल 10 ऑक्टोबरच्या सुमारास या शूटिंगसाठी जॉईन होऊ शकतो. रणबीर कपूरचा सोलो सीक्वेन्स शूट झाल्यानंतर विकी आणि रणबीर यांच्यातील मैत्रीचा भाग शूट केला जाणार आहे. स्टारकास्टच्या तारखा लक्षात घेऊन या चित्रपटाचे वेळापत्रक आखले गेले आहेत.
सध्या आलिया यशराजच्या स्पाय युनिव्हर्स अल्फा या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ती नोव्हेंबरच्या शेवटी किंवा डिसेंबरच्या सुरुवातीला या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण करेल आणि लव्ह अँड वॉरसाठी विकी आणि रणबीरसोबत सामील होणार आहे.
हे देखील वाचा- प्रेक्षकांनी केला स्त्री २ वर पैशांचा पाऊस! गाठला ५०० कोटींचा टप्पा! बजेटहून किती पटीने जास्त कमाई?
कधी रिलीज होणार चित्रपट?
24 जानेवारी 2024 रोजी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. हा चित्रपट 2025 मध्ये ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूर आणि विकी कौशल मोठ्या पडद्यावर लव्ह अँड वॉर या चित्रपटातून पुन्हा एकत्र प्रेक्षकांना दिसणार आहेत. यापूर्वी ते ‘संजू’ या चित्रपटामध्ये एकत्र काम करताना दिसले होते. तसेच आता ब्रह्मास्त्रनंतर रणबीर आणि आलियाची जादू पुन्हा एकदा रुपेरी पडद्यावर चाहत्यांना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाची रिलीज डेट अद्यापही समोर आली नसून, ती लवकरच समजेल अशी आशा आहे.