
(फोटो सौजन्य-Social Media)
सोनी लिव्ह रोमांचक सिरीज ‘मानवत मर्डर्स’ प्रदर्शित करण्यास सज्ज आहे. ही सिरीज १९७२ ते १९७४ दरम्यान घडलेल्या भयावह हत्यांकाडावर आधारित आहे. ही सिरीज पोलिस अधिकारी रमाकांत एस. कुलकर्णी यांच्या चौकशी करण्यासंदर्भातील निरंतर प्रयत्नांना दाखवते. आशुतोष गोवारीकर यांनी रमाकांत यांची भूमिका साकारली आहे, तसेच या सिरीजमध्ये गुंतागूंतीच्या केसेस सोडवण्यासाठी आवश्यक असलेली समर्पितता आणि कौशल्य दाखवले गेले आहे.
प्रख्यात अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी या सिरीजमध्ये उत्तमराव बऱ्हाटे ही भावूक भूमिका साकारली आहे. या भूमिकेबद्दल सांगताना ते म्हणाले, ”पूर्ण न झालेल्या इच्छांमध्ये गुरफटून गेलेल्या उत्तमरावची भूमिका साकारणे आव्हानात्मक, पण खास भावना आहे. ही भूमिका माझ्या नेहमीच्या विनोदी भूमिकांपेक्षा वेगळी आहे. मला ही संधी दिल्याबद्दल आदिनाथ कोठारे आणि आशिष बेंडे यांचे मी आभार मानतो.” असे अभिनेता म्हणाला आहे.
मानवत गावाजवळील एका गावामध्ये मोठे झालेले अनासपुरे यांच्या या हत्याकांडासंदर्भातील भयावह कथांबाबत काही आठवणी आहेत. ते म्हणाले, ”मानवत गावाजवळ असलेल्या बीड गावामधील असल्यामुळे ‘मानवत मर्डर्स’च्या भयावह कथांनी मला बालपणीच्या भितीची आठवण करून दिली. या भयावह हत्याकांडाबाबत आमच्या गावांमध्ये चर्चा केली जायची, ज्याचा आमच्या दैनंदिन जीवनावर परिणाम झाला होता. आम्ही फक्त सायंकाळपर्यंत खेळायचो आणि अंधार झाला की संपूर्ण गाव स्मशानासारखे शांत होऊन जायचे.” असे त्यांनी सांगितले.
हे देखील वाचा- ‘रात जवां है’ दिग्दर्शक सुमीत व्यास पदार्पणाबाबत झाले व्यक्त, म्हणाले ”मला कलाकारांना जबरदस्तीने… “
स्टोरीटेलर्स नुक (महेश कोठारे व आदिनाथ कोठारे) निर्मित आणि आशिष बेंडे यांचे दिग्दर्शन असलेली सिरीज ‘मानवत मर्डर्स’ रमाकांत एस. कुलकर्णी यांचे आत्मचरित्र ‘फूटप्रिंट्स ऑन द सँड ऑफ क्राइम’वर आधारित आहे. या सिरीजमध्ये आशुतोष गोवारीकर, सई ताम्हणकर आणि सोनाली कुलकर्णी यांसारखे प्रतिभावान कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. हि सिरीज येत्या ४ ऑक्टोबरला सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे.