
(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
बॉलीवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायमूर्ती मनमीत प्रीतम सिंग अरोरा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी होणार आहे. सलमान खानने त्याच्या परवानगीशिवाय त्याचे नाव, प्रतिमा, आवाज आणि इतर ओळख माहिती व्यावसायिकरित्या वापरणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांविरुद्ध ही याचिका दाखल केली आहे.
सलमान खानचा आरोप आहे की जाहिराती, ऑनलाइन सामग्री, सोशल मीडिया पोस्ट आणि इतर व्यावसायिक क्रियाकलापांमध्ये त्याच्या प्रतिमेचा आणि ओळखीचा गैरवापर केला जात आहे, जे पूर्णपणे खोटे आहे. त्याने या खटल्यात कायदेशीर भाषेत जॉन डो म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अज्ञात संस्थांनाही पक्षकार म्हणून नाव दिले आहे. अभिनेत्याची बनावट कंटेंट आणि फेक डीपी आता डोकेदुखी बनली आहे. आता न्यायालय यावर काय सुनावणी देतात हे पाहणे उत्सुतेचे ठरणार आहे.
अनेक कलाकारांनी न्यायालयात घेतली धाव
अलिकडच्या काळात, अनेक प्रमुख व्यक्तींनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. ८ डिसेंबर रोजी, दक्षिण भारतीय अभिनेता एनटीआर ज्युनियर (नंदमुरी तारका रामा राव) यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अशीच एक याचिका दाखल केली. त्या प्रकरणात, न्यायमूर्ती अरोरा यांनी सोशल मीडिया आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मना आयटी नियम २०२१ अंतर्गत याचिका तक्रार म्हणून हाताळण्याचे आणि आवश्यक ती कारवाई करण्याचे निर्देश दिले.
अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षणासाठी केली मागणी
शिवाय, दिल्ली उच्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी यापूर्वी आध्यात्मिक गुरू श्री रविशंकर, अभिनेता नागार्जुन, ऐश्वर्या राय बच्चन, अभिषेक बच्चन आणि चित्रपट निर्माता करण जोहर यांच्यासह अनेक सेलिब्रिटींच्या व्यक्तिमत्त्व हक्कांचे संरक्षण केले आहे. आणि आता अखेर बॉलीवूडचा भाईजान म्हणजेच सलमान खान देखील पोहचला आहे.
सलमान खानचे आगामी चित्रपट
सलमान खान पुढील वर्षी “बॅटल ऑफ गलवान” मध्ये दिसणार आहे. अपूर्व लाखिया दिग्दर्शित या चित्रपटात चित्रांगदा सिंग देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्याचा “किक २” देखील पाइपलाइनमध्ये आहे. या चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखा अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. परंतु हा चित्रपट पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत.