
फोटो सौजन्य - Social Media
महाभारतातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या आणि तितक्याच शोकांतिकेने व्यापलेल्या कर्णाच्या जीवनावर आधारित ‘द लेजंड ऑफ कर्ण’ ही ओरिजिनल अॅनिमेटेड सिरीज ३१ जुलैपासून सोनी लिव्हवर प्रदर्शित होणार आहे. शरद देवराजन आणि जीवन जे. कांग यांनी निर्मिती केलेली, तर ग्राफिक्स इंडियाने साकारलेली ही सिरीज कर्णाच्या आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याचा प्रयत्न करते. आधुनिक अॅनिमेशन, प्रभावी कथानक आणि महाभारताच्या भव्य पार्श्वभूमीमुळे ही सिरीज प्रेक्षकांसाठी खास ठरणार आहे.
महाभारतातील अनेक पात्रांमध्ये कर्ण हे सर्वाधिक गुंतागुंतीचे व्यक्तिमत्त्व मानले जाते. सूर्यदेव आणि कुंतीचा पुत्र असूनही एका सारथ्याच्या घरी वाढलेल्या कर्णाला जन्मापेक्षा त्याच्या गुणवत्तेची ओळख निर्माण करण्यासाठी आयुष्यभर संघर्ष करावा लागला. धनुर्विद्येतील त्याचे असामान्य कौशल्य, समाजाने केलेला भेदभाव आणि स्वाभिमान जपत त्याने केलेली वाटचाल या सिरीजमध्ये प्रभावीपणे मांडण्यात आली आहे.
कथानकात हस्तिनापूरातील स्पर्धेपासून कर्णाच्या आयुष्याला नवे वळण मिळते. राजघराण्यासाठी राखीव असलेल्या मैदानात प्रवेश करून तो आपल्या पराक्रमाची झलक दाखवतो आणि त्यानंतर घडणाऱ्या घटनांमुळे संपूर्ण राज्याच्या इतिहासाची दिशा बदलते. दुर्योधनाशी निर्माण झालेली मैत्री, त्याच्यावरील अढळ निष्ठा, राजकारण, लपलेली सत्ये आणि नियतीशी सुरू असलेला संघर्ष या सर्वांचा रोमांचक प्रवास या सिरीजमध्ये अनुभवायला मिळणार आहे.
कर्णाची कथा ही केवळ एका योद्ध्याची नाही, तर समाजाने नाकारलेल्या व्यक्तीने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मिळवलेल्या सन्मानाची कहाणी आहे. वंश, जन्म आणि सामाजिक स्थान यापलीकडे जाऊन स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी त्याने दिलेला लढा आजच्या काळातही तितकाच प्रेरणादायी ठरतो. त्यामुळे ही सिरीज केवळ पौराणिक कथा न राहता आत्मविश्वास, निष्ठा आणि संघर्षाचे प्रतीक म्हणूनही समोर येते.
सिरीजबाबत बोलताना ग्राफिक्स इंडियाचे सह-निर्माते आणि शोरनर शरद देवराजन यांनी सांगितले की, कर्ण हा नेहमीच महाभारताचा भावनिक केंद्रबिंदू राहिला आहे. जन्मामुळे ज्याला नाकारण्यात आले, त्याने आपल्या कर्तृत्वाने महानता मिळवली. आजही “महानता जन्मावर ठरते की कर्मावर?” हा प्रश्न तितकाच महत्त्वाचा असल्याचे त्यांनी नमूद केले. कर्णाची कथा त्याला साजेशा भव्यतेने आणि संवेदनशीलतेने मांडण्याचा प्रयत्न या सिरीजमधून करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भव्य अॅनिमेशन, प्रभावी दृश्यरचना आणि महाभारतातील एका महान योद्ध्याचा संघर्ष नव्या पिढीसमोर मांडणारी ‘द लेजंड ऑफ कर्ण’ ही सिरीज ३१ जुलैपासून फक्त सोनी लिव्हवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. महाभारतावर आधारित कथा आवडणाऱ्या प्रेक्षकांसाठी ही सिरीज एक वेगळा आणि भव्य अनुभव ठरण्याची शक्यता आहे.