
(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांचे एक विधान गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या विषयावर इंडस्ट्रीतील अनेकांनी विविध प्रकारे आपले मत व्यक्त केले आहे. जावेद अख्तर, राम गोपाल वर्मा आणि रणवीर शोरे यांसारख्या अभिनेत्यांनी यापूर्वी यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. आता, वहिदा रहमान यांनी स्वतः प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी हा भारत देश सगळ्यांचा आहे असे म्हटले आहे.
ऑस्कर आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते संगीतकार ए.आर. रहमान हे त्यांच्या एका विधानामुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. अलिकडेच रहमान यांनी जातीय भेदभावामुळे इंडस्ट्रीत काम न मिळाल्याबद्दल त्यांचे दुःख व्यक्त केले होते. तेव्हापासून, हा मुद्दा इतका महत्त्वाचा बनला आहे की यावर अजूनही वाद सुरूच आहे. आता, वहिदा रहमान यांनीही या विषयावर भाष्य केले आहे. अभिनेत्री नक्की काय म्हणाली जाणून घेऊयात.
ए.आर. रहमान यांच्या विधानावर वहिदा यांचे मत
स्क्रीनला दिलेल्या अलिकडेच दिलेल्या मुलाखतीत, हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रहमान यांनी ए.आर. रहमान यांच्या विधानावर आपले मत व्यक्त केले. या विधानानंतर ती म्हणाली, “आपण कोणावर विश्वास ठेवावा आणि किती विश्वास ठेवावा? हे खरे असो वा नसो, आपण या सगळ्यात विषयात का गुंतायला हवं? माझ्या आयुष्याच्या या टप्प्यावर, मला या सगळ्यात अडकायचे नाही आहे. पण मी नक्कीच म्हणेन की आपण शांततेत राहायला शिकले पाहिजे. हा देश आपला आहे. शांत राहा आणि फक्त आनंदी राहा.” असे म्हणून अभिनेत्रीने आपले मत मांडले आहे.
वहीदा रहमान पुढे म्हणाल्या, “वेळ कधीच सारखी नसते. कधीकधी तुम्हाला खूप काम मिळते, आणि कधीकधी मिळत नाही. हे सर्व घडते. प्रत्येक गोष्टीसाठी एक वेळ असते. एका विशिष्ट वयानंतर, लोक म्हणतात की काहीतरी वेगळे किंवा नवीन आयुष्यात घडायला हवे. यामुळे, काही लोक मागे पडतात, तर काही पुढे जातात. मान्य आहे की, काही लोक नेहमीच काम करत असतात आणि वरच्या पदावर राहतात, परंतु नेहमीच असे होईल असे नाही.”
ए.आर. रहमान यांचे वक्तव्य
बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत ए.आर. रहमान यांनी त्यांच्याकडे काम नसल्याबद्दल निराशा व्यक्त केली आणि म्हटले की गेल्या आठ वर्षांत बॉलीवूडमध्ये सत्ता बदलली आहे. आता, जे सर्जनशील नाहीत त्यांच्याकडे ही शक्ती आहे. “मला आठ वर्षांपासून काम सापडले नाही,” ते म्हणाले. “हा एक जातीय दृष्टिकोन असू शकतो.” तेव्हापासून त्यांच्या विधानामुळे बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये वाद निर्माण झाला आहे.